
नाशिक:-(. प्रतिनिधी ) जीवन समजून घेताना आपल्याला भेटलेली माणसं वाईट कधीच नसतात. पण माणसाच्या वाट्याला आलेली परिस्थिती वाईट असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गझलकार संजय गोरडे यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात २२९वे पुष्प गुंफताना ते ‘मी कोरा कागद केवळ’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सोमनाथ साखरे होते.
श्री.गोरडे पुढे म्हणाले की, कल्पना करून कविता जन्माला येत नाही; त्यासाठी शब्द आतून यावे लागतात. बालपणावर परिणाम करणारे अनेक क्षण आता निघून गेले आहेत. म्हणून शहराच्या दिशेने गेलेली माणसं आता गावाकडे फिरकत नाहीत. म्हणून गावाकडचे वाडे जणुकाही म्हातारे झाले आहेत. आठवणीची राख पदराला बांधण्यासारखे
काहीच उरले नाही; अशी खंत नेहमी वाटते. नदीच्या काठावर राहूनसुद्धा घसा कोरडा राहतो; हे दु:ख बोचत राहते. मन आणि मौन यातील फरक जाणता आली पाहिजे. जाणिवा आणि भावना शब्दबद्ध करताना कविता नेमकेपणा मांडता आली पाहिजे, असे सांगून संग्रहातील विविध कविता सादर केल्या.
स्मिता बनकर आणि सुरेश चौरे यांना ग्रंथभेट देण्यात आली. उपक्रमाचे अध्यक्ष मधुकर गिरी यानी आभार मानले तर सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या मंगळवारी (१७) ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र कोठावदे ‘ऐलपैल’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
