
प्रा.सुमती पवार ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उदघाटक
नाशिक( प्रतिनिधी):- इगतपुरी तालुका साहित्य मंडळाचे सुप्रसिद्ध नाटककार दत्ता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणारे २६वे ग्रामीण साहित्य संमेलन तिडके कॉलनीतील ग्रामसेवक भवनात रविवार (दि.२२) रोजी होणार आहे. या संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिका प्रा.सुमती पवार यांच्या हस्ते होणार असून निवृत्त ग्रामविकास अधिकारी कैलास वाकचौरे हे स्वागताध्यक्ष असणार आहेत.
ज्येष्ठ साहित्यिका प्रा.सुमती पवार यांची ३० पुस्तके प्रकाशित असून त्यात काव्यसंग्रह, बालगीत संग्रह, ललित लेखन यांचा समावेश आहे. विश्वास रेडिओवर २०१८ पासून नियमित सकाळी साडेदहा वाजता “नातवंडांशी गप्पा” हा त्यांचा उपक्रम सुरू आहे. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या दोन कवितांचा समावेश आहे. १९९२ पासून त्यांची अक्षरोपासना सुरू आहे. अनेक नियतकालिकांमधून त्यांनी विपुल लेखन केले आहे. तिसऱ्या शेकोटी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. अनेक साहित्यिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. विविध संस्थांचे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या कालावधीत हे संमेलन तीन सत्रात संपन्न होणार असून साहित्य रसिकांनी सहभागी होण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
