
नाशिक दिनांक ८- (बातमीदार)मराठी भाषेच्या सौंदर्याची, शिस्तबद्ध लेखनाची आणि अक्षरकलेच्या नजाकतीची अनुभूती देणाऱ्या मराठी राजभाषा हस्ताक्षर स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असून शिक्षकांसाठीही अशा स्पर्धा होणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन ज्ञानवर्धिनी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गोपाळ पाटील यांनी केले ते मराठी भाषेच्या संवर्धन व संवर्धनासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये शुद्ध, सुबक आणि प्रभावी लेखनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, नाशिक आणि अक्षर कौशल्य कोचिंग इन्स्टिट्यूट यांच्यावतीने मराठी राजभाषा हस्ताक्षर स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या स्पर्धेच्या माध्यमातून मराठी भाषेतील सौंदर्य, शिस्तबद्ध लेखनशैली आणि हस्ताक्षरातील सौष्ठव यांचा गौरव केला गेला. नाशिक शहरातील विविध शाळांमधील इयत्ता चौथी ते नववीच्या ४७६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना सुंदर हस्ताक्षर, शब्दांची मांडणी, अक्षरांची स्पष्टता व एकूण सादरीकरण या निकषांवर गुणांकन करण्यात आले. उत्कृष्ट हस्ताक्षर असणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष सुभाष सबनीस होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मॉडर्न एज्युकेशन संस्थेचे शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक निलेश तिवारी होते. अक्षरकौशल्य कोचिंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा.वैशाली फळे व त्यांच्या टीमने संयोजन केले.
या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे:-
मोठा गट इयत्ता सातवी ते नववी
प्रथम क्रमांक समर्थ गणेश शेळके मराठा हायस्कूल इयत्ता आठवी, द्वितीय क्रमांक जानवी किशोर सोनवणे माध्यमिक विद्यालय उंटवाडी इयत्ता नववी, तनिष्का भारत गांगुर्डे माध्यमिक विद्यालय उंटवाडी इयत्ता सातवी, तृतीय क्रमांक उत्तेजनार्थ मीनल विनोद कोठावदे, मराठा हायस्कूल इयत्ता आठवी.
लहान गट इयत्ता चौथी ते सहावी
प्रथम क्रमांक वृषभ योगेश निकम, माध्यमिक विद्यालय उंटवाडी -इयत्ता सहावी,द्वितीय क्रमांक सृष्टी चेतन चव्हाणके, माध्यमिक विद्यालय उंटवाडी -इयत्ता पाचवी, तृतीय क्रमांक श्रावणी कमलाकर भारंबे, अभिनव बाल विकास मंदिर, उत्तम नगर- इयत्ता चौथी उत्तेजनार्थ श्रेया किरण मोरे अभिनव बाल विकास मंदिर गंगापूर रोड -इयत्ता चौथी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक वैशाली फळे यांनी केले तर सूत्रसंचालन अलका कुलकर्णी यांनी केले. यावेळी व्यासपीठावर बालकुमार साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष स्मिता बनकर कार्यवाह दिगंबर काकड उपस्थित होते.
