
नांदगाव(प्रतिनिधी) : आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची महत्त्वपूर्ण बैठक संस्थापक अध्यक्षा सौ. संगीता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या १३ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती कार्यालयावर धडक ‘बिऱ्हाड मोर्चा’ काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.या बैठकीचे आयोजन देवी मंदिरात करण्यात आले होते.

यावेळी प्रारंभी ‘त्यागमुर्ती’ माता रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जेष्ठ नागरिक शरद शेजवळ यांनी माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महिलांनी माता रमाईंच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या त्यागाची स्मृती जागवली.सचिव आशाबाई काकळीज मनीषा भाबड यांनी माता रमाई यांच्या जीवनावर भाषण केले यानंतर अनेक ठिकाणी शालेय पोषण आहारामध्ये मिळणारे धान्य आणि खाद्यपदार्थ हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत गंभीर तक्रारी होत्या. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन, संस्थेने याविरोधात तीव्र भूमिका घेण्याचे ठरवले आहे.लहान लेकरांच्या जीवनाशी खेळ नको अशी भूमिका संस्थेच्या वतीने घेण्यात आली आहे यासाठी प्रशासनाच्या विरोधात एल्गार करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला संस्थेच्या सरला मोढे,वंदना बहिकर,सुमित्रा शिंदे,मनिषा भाबड,रत्ना मगर आशा भोसले, सरला वाबळे,शगुफ्ता शेख, रुबिना शेख अलका गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून, गावपातळीवर महिलांना संघटित करण्याची जबाबदारी महिला कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली आहे.
प्रशासनाविरोधात एल्गार:
संस्थेच्या अध्यक्षा सौ. संगीता सोनवणे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांच्या अनेक समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. न्याय हक्कासाठी आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. याच भूमिकेतून १३ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीवर भव्य बिऱ्हाड मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यावेळी संस्थेच्या सर्व महिला त्याच निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्यचे अन्न शिजवून सबंधित अधिकाऱ्यांना खाऊ घालणार असल्याचे सांगितले या मोर्चात तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
