
नांदगाव(प्रतिनिधी): येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त विविध स्पर्धांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त निबंध, वक्तृत्व, वादविवाद, रांगोळी, मेहंदी, पारंपरिक वेशभूषा, आनंद मेळावा, पुष्परचना आणि विविध गुणदर्शन इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. याचसोबत रोज डे, चॉकलेट डे, मिसमॅच डे, साडी डे, टाय डे, बॉलिवूड डे, ब्लॅक अँड व्हाईट डे आणि पारंपरिक वेशभूषा दिन साजरा करण्यात आला. वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त आयोजित सर्व स्पर्धा आणि उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
०६ फेब्रुवारी होणाऱ्या विविध गुणदर्शन आणि वार्षिक गुणगौरव समारंभामध्ये या सर्व उपक्रमातील आणि वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
०५ फेब्रुवारी रोजी आयोजित आनंद मेळाव्यात महाविद्यालयातील सर्व विद्याशाखातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून आनंद मेळावा साजरा केला. विविध पाककृती बनवत विद्यार्थ्यांनी अर्थार्जनाचे धडे गिरविण्याचा प्रयत्न केला. आनंद मेळाव्याचे उद्घाटन मा. प्राचार्य एन. यू. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आनंद मेळावा समितीचे अध्यक्ष प्रा. महादेव आटोळे, सदस्य प्रा. योगेश वाघ, प्रा. अंकुश लव्हाटे, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. चिंतामण निगळे, परीक्षक डॉ. सुरजकुमार प्रसाद, डॉ. प्रतिभा जाधव आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
