
सिन्नर- (परतिनिधी ) येथील चांडक कन्या विद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी उदयजी सांगळे व शितलताई सांगळे यांच्या उदार दातृत्वातून बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिन्नर तालुका भाजप नेते व सह्याद्री युवा मंच,सिन्नर चे अध्यक्ष उदयजी सांगळे तसेच माजी नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षा शितलताई सांगळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे शालेय समिती अध्यक्ष ॲड.श्रीराम क्षत्रिय होते.

यावेळी व्यासपीठावर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका माधवी पंडित,पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे,शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता कर्डिले, पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे,शिक्षक प्रतिनिधी उत्तम भोये तसेच पालक शिक्षक संघाचे सर्व कार्यकारणी सदस्य उपस्थिती होते.
प्रमुख पाहुणे उदयजी सांगळे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींना ध्येय निश्चित करा, सातत्याने चांगला अभ्यास करा आणि आपल्या शाळेचे तसेच आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करा असा प्रेरणादायी संदेश दिला. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे शाळेतील सुरक्षितता,शिस्त व शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम होईल, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नीलिमा दुसाने व आभार शिक्षक प्रतिनिधी उत्तम भोये यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
हा उद्घाटन सोहळा शाळेच्या सुरक्षित व प्रगत वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
