
सिन्नर (प्रतिनिधी )
तालुक्यातील वडांगळी येथील सतीमाता सामतदादा यात्रेत दरवर्षी लाखोच्या संख्येने बंजारा भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून श्रद्धेपोटी येऊन सतीमाता व सामतदादा यांच्याचरणी नतमस्तक होतात. बंजारा भाविक सामतदादाला मांस व दारूचा नैवद्य दाखवतात तर सतीमातेला गोडभात,पुरणपोळीचा नैवद्य दाखवतात. सामत दादा समोर भाविक हजारो बोकडांचा बळी देतात.कायद्याने पशुहत्या करण्यास परवानगी नसताना भाविक कायद्याची पायमल्ली करून बिनधास्तपणे बोकडबळी देतात. ही अंधश्रद्धा असून गेल्या शतकाहून अधिक काळ ही प्रथा आजतागायत सुरू आहे. नवस केल्याने देव पावत नाही, याउलट देव माणसात आहे,पशुहत्या करून देव कधीच प्रसन्न होत नाही.देव बोकड मागत नाही,अशा प्रकारचे प्रबोधन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या 30/ 35वर्षांहून अधिक काळापासून करीत आहे.प्रथा बंद जरी पडली नाही तरी त्याचे प्रमाण पन्नास ते साठ टक्क्यांवर आले आहे, हा महाराष्ट्र अंनिसचा नैतिक विजय आहे.यावेळी सिन्नरच्या अंनिसच्या वतीने प्रबोधन करण्यात आले.यावेळी नाशिक जिल्हा महा.अनिसचे उपाध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके यांनी बोकडबळी अनिष्ट प्रथा असून ती बंद करा,मुलाबाळांचे शिक्षण करा त्यासाठी बंजारा समाजातील तरुणांनी सहभाग घेऊन ही प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.यावेळी सिन्नर अंनिसचे कार्याध्यक्ष सुकदेव वाघ,प्रधान सचिव दीपक भालेराव, पदाधिकारी प्रभाकर चतुर,उपाध्यक्ष सुनील कुऱ्हे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रबोधनकार संदीप पडवळ यांची उपस्थिती मोलाची ठरली.यावेळी ॲडव्हान्स ॲड.गोपाल भालेराव,पोलिस अधिकारी निलेश पाटील,दिनकर पारधी, गेनू सोनवणे, कविता चव्हाणके,दीपिका चव्हाणके,अमोल वाजे,स्वप्नील चव्हाण आदी उपस्थित होते. एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त होता.
