
: मनमाड साहित्य संघाच्या बैठकीस उपस्थित कवी, लेखक, रसिक व साहित्यप्रेमी.
मनमाड, (प्रतिनिधी) ता. ३१ –
जेष्ठ समीक्षक म. सु. पाटील यांच्या साहित्यसहवासामुळे मनमाड शहराला राज्यभर “साहित्याचे जंक्शन” म्हणून ओळख मिळाली असून ही समृद्ध साहित्यपरंपरा पुढे नेण्यासाठी कवी, लेखक, वाचक व साहित्यप्रेमींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने मनमाड साहित्य संघाची स्थापना करण्यात आली आहे. नुकतीच संघाची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.
निगराणी शाळेत झालेल्या बैठकीत साहित्य क्षेत्रातील विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. मनमाडची साहित्यिक ओळख अधिक भक्कम करणे, नव्या पिढीतील साहित्यनिर्मितीला चालना देणे, वाचन संस्कृती वाढवणे तसेच साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविणे या हेतूने साहित्य संघ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. संघाच्या वतीने विविध कविता स्पर्धा, कथा स्पर्धा, साहित्य संमेलने आणि वाचन प्रेरणा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून शहरातील साहित्यिक चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी प्राचार्य सदाशिव सुतार, कार्यवाहपदी अमोल खरे तर सचिवपदी जनार्दन देवरे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून डॉ. रवींद्र सुर्वे, कोषाध्यक्ष म्हणून विकास काकडे यांची निवड झाली असून कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रदीप गुजराथी, शांताराम वाघ, सौ. मंदोदरी पाटील, सौ. प्रिया निकुंभ–परदेशी राजू लहिरे, आणि डी. टी. पवार तर मार्गदर्शक म्हणून अशोक परदेशी आणि नरेश गुजराथी यांची निवड करण्यात आली.
यावेळी डी. डी. पाटील, हेमंत वाले, संदीप देशपांडे, प्रा. डॉ. जे. वाय. इंगळे, सुरेंद्र भुजंग, प्रा डॉ अलका नागरे,राम महाले आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते.
बैठकीत नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, साहित्यिक वातावरण बळकट करणे आणि मनमाड शहराची साहित्यनगरी म्हणून ओळख अधिक दृढ करणे यासाठी संघ सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
