
सिन्नर (प्रतिनिधी ) वसंत पंचमी निमित्त नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या संजीवन बाल विद्यामंदिर वारकरी भवन विजयनगर सिन्नर येथे विद्यारंभ संस्कार सोहळा संपन्न झाला ह्या मंगलमय सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी श्रीमती विणा ताई देशमुख व श्रीमती सुधाताई लोखंडे ह्या उपस्थित होत्या. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ रोहिणी देशपांडे आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांडक विद्यालयाच्या माजी सेविका सुमन शिंदे ह्याही मंगलमय सोहळ्यात मुलांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होत्या. विद्यारंभ संस्कार म्हणजे आपले मूल जेव्हा चार वर्ष चार महिने चार दिवस वयाचा पूर्ण होतो त्यावेळेस हे संस्कार करतात येथूनच मुलांच्या शिक्षणाचा प्रवास सुरू होतो आपल्या हिंदुसंस्कृतीत सांगितलेल्या १६ संस्कारांपैकी एक संस्कार आहे जो आपण आपल्या मुलांवर करायला हवा.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले आणि ग्रंथ दिंडीचे पूजन करून माता पालकांनी ग्रंथ आपल्या डोक्यावर घेऊन व ग्रंथ पालखीत ठेवून परिसरातून दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये घोषवाक्यांच्या आवाजात व टाळांच्या गजरात परिसरात प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले परिसरातील रहिवाशांनी दिंडीचे छान स्वागत केले त्यानंतर पालखीचे व अतिथींचे,माता पालकांचे औक्षण करून त्यांना पूजेसाठी आसन ग्रहण करण्यास सांगितले पूजेसाठी व होम हवन याची पूर्ण तयारी केलेली होती.माता पालक व बालक यांना पूजेसाठी बसवून सरस्वती वंदना गणपती पूजन करून होम प्रज्वलित करण्यात आला या यामध्ये अकरा वेळा गायत्री मंत्राने आहुती दिली व पंचमहाभूतांच्या शांतीसाठी प्रत्येकी तीन वेळा आहुती देण्यात आली. तसेच राष्ट्राच्या एकात्मता व कल्याणासाठी ही आहुती देण्यात आली,तसेच बालकांना मातेच्या उजव्या मांडीवर बसून सरस्वती मातेचा 108 वेळा मंत्र जप करण्यात आला. त्यानंतर बालकांनी मातेला साष्टांग नमस्कार करून आशीर्वाद घेतला. शिशु वाचनमला ह्या पुस्तिकेचे पूजन करून त्यावरील अक्षरांचा माता आणि बालक यांनी उच्चार करून पहिल्या बोटाच्या साह्याने त्यावरील अक्षरे सात वेळा गिरवून उच्चार केला, त्यानंतर मुलांचे पाटीपूजन करून घेतले. माता व बालकांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन केले व आशीर्वाद घेऊन प्रसाद ग्रहण केला.तसेच विद्यारंभ संस्काराचे महत्त्व सांगितले. माता पालक व अतिथी यांनी सुसंवाद साधला हा सोहळा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका सौ.मंजुषा मिलिंद भार्गवे व सेविका सौ.लक्षमी बाबासाहेब उगले यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम यशस्वी केला.
