
लेखक:- श्रीकांत बेणी
अध्यक्ष
वसंत व्याख्यानमाला नासिक
सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त नवलनाथ तांबे यांचे दुःखद निधन झाले. उद्या, दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी नाशिकच्या रामकुंडावर त्यांचा दशक्रिया विधी आयोजित करण्यात आलेला आहे .
त्यानिमित्त तांबे यांच्या जीवनप्रवासावरील ही स्मरणगाथा.
70–80 वर्षांपूर्वी खडांबे, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून लक्ष्मण काका तांबे यांचे नोकरी निमित्त नाशिकमध्ये स्थलांतर होऊन तांबे कुटुंबीय स्थिरावले. प्रारंभी डिंगर आळी, बुधवार पेठ, अशोक स्तंभावरील शर्मा चाळ, त्यानंतर गंगापूर रोडवरील शांतिनिकेतन कॉलनी असा तांबे कुटुंबीयांचा निवासी प्रवास झाला.
लक्ष्मण काका तांबे यांचे पुत्र — अनिल हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत, तर दुसरे चिरंजीव अशोक हे मायको कंपनीमध्ये नोकरीला लागले. विक्रांत तांबे हे गावाकडे शेती सांभाळतात .कनिष्ठ चिरंजीव नवलनाथ यांनी राहुरी कृषी विद्यापीठातून विज्ञान शाखेत कृषी विभागाची पदवी घेतली. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि नाशिकच्या पोलीस प्रबोधिनीत कठोर प्रशिक्षण घेऊन 15 जून 1989 रोजी महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाले.
प्रारंभी नागपूर, त्यानंतर लोणी, नासिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा
वाडी वाऱ्हे ,शिर्डी, अहमदनगर नाशिक येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात, जात पडताळणी विभागात आणि सरतेशेवटी नाशिक पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त असा त्यांचा प्रगतीचा प्रवास झाला.
30 सप्टेंबर 2021 रोजी नवनाथ तांबे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले.
तांबे यांनी जिथे जिथे नोकरी केली तिथे तिथे पोलीस दलाचा दरारा निर्माण केला.
“सद् रक्षणाय,
खल निग्रहनाय” हे पोलीस विभागाचे ब्रीदवाक्य लक्षात ठेवून त्यांनी सदैव कार्य केले. गुंडांसाठी वर्दीचा दरारा आणि सज्जनांसाठी आश्वासक आसरा बनण्याचे काम नवलनाथ यांनी केले.
नगरचा जवखेडा हत्याकांड, शिर्डी येथील नामचीन गुंड यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांचे तपास तांबे यांनी केले आणि आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहोचवले.
साईबाबांच्या चरणी शिर्डी येथे कार्यरत असताना, तांबे यांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासमोर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. परिणामी, आज शिर्डी येथे सुरक्षिततेच्या ज्या विविध उपाययोजना दिसतात, त्यांच्या मुळाशी तांबे यांच्या रोडमॅप संकल्पनेचा मोठा वाटा आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर स्वतःहून केलेल्या सादरीकरणामुळे काही वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर नाराज झाले. या नाराजीचा त्रासही तांबे यांना सहन करावा लागला. परंतु, “पोलीस दलात यासाठीच आलो आहे; माझे कर्तव्य पार पाडण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही,” असे त्यांनी ठासून सांगितले.
अरविंद इनामदार, हिमांशु रॉय, दीपक पांडे यांसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांशी उत्तम संबंध नवलनाथ तांबे यांनी निर्माण केले आणि परिणामतः पोलीस दलात आपला वेगळा ठसा उमटवण्यात ते यशस्वी ठरले. सेवाकाळात अनेक सहकारी अडचणीत सापडल्यावर मदतीचा हात देणारा हक्काचा माणूस म्हणून ते ओळखले जात.
वडील लक्ष्मण काका तांबे हे नाशिक जिल्हा सरकारी कर्मचारी संघटनेचे अनेक वर्षे अध्यक्ष होते. त्यामुळे वडिलांकडून मिळालेला समाजसेवेचा वारसा नवलनाथजींनी अखेरपर्यंत जपला.
लोणी येथे कार्यरत असताना, सुप्रसिद्ध समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी सुरू केलेल्या अनाथ आश्रमाला तांबे यांनी सर्वतोपरी सहकार्य केले आणि प्रारंभीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
तेथेच त्यांचे बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी स्नेहसंबंध जुळले. त्यानंतर ना. राधाकृष्ण विखे पाटील, अशोक विखे पाटील, तसेच बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे यांच्याशी घरोब्याचे संबंध निर्माण झाले.
नासिक मध्ये डॉक्टर वसंतराव पवार उत्तमराव ढिकले, पोपटराव हिरे ,प्रकाश मते यांच्याशीही तांबे कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
बालपणापासून यशवंत व्यायामशाळेत जात असल्याने त्यांचा मोठा मित्रपरिवार नाशिकमध्ये निर्माण झाला. त्यापैकी मंदार देशमुख, उमेश
आटवणे, मनोज भोसले, नितीन भोसले आदींनी नाशिक येथे स्वर्गीय सुरेखाताई भोसले खो-खो अकादमी स्थापन केली होती. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील मुलींना नाशिक येथे आणून त्यांना खेळात पारंगत करणे आणि शिक्षणाची व्यवस्था करणे, हे त्यांचे व्रत होते. या अकादमीच्या पाठीशी नवलनाथ यांच्या रूपाने खात्रीशीर मदतीचा हात कायम असायचा.
राजेंद्र निंबाळते, सुनील गायकवाड यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावावर सातत्याने विविध स्पर्धा आयोजित केल्या आणि त्यांच्या पाठीशी तांबे ठामपणे उभे राहत.
नाशिकच्या 102 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या यशात तांबे यांचा मोलाचा सहभाग होता.
नोकरी निमित्त महाराष्ट्रभर फिरत असतानाही त्यांनी कुटुंबाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. पत्नी उषा यांच्या मदतीने प्रसाद, प्रसन्ना आणि पूजा या मुलांवर उत्तम संस्कार केले आणि सर्व मुलांना उच्चशिक्षित करून व्यवसायात स्थिरस्थावर केले.
मुलगी पूजा ही रोलर स्केटिंग या खेळात पारंगत झाली. तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. हरियाणातील रोहतक येथील केंद्रीय क्रीडा विद्यापीठातून तिने पदवी संपादन केली आणि नुकतीच दिल्ली येथे एका नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीला लागली. पूजाच्या निमित्ताने तांबे कुटुंबाला परदेशात क्रीडा स्पर्धांसाठी जाण्याची संधीही मिळाली.
सेवानिवृत्तीनंतर कुटुंबीयांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळत असतानाच, दुर्दैवाने तीन महिन्यांपूर्वी त्यांना गंभीर आजाराने ग्रासले. नाशिकमधील सुयश रुग्णालयात डॉ. प्रदीप पवार, डॉ. बागरेचा डॉ. दुबे, डॉ. ओस्तवाल, डॉ. शेलार आदींनी अत्याधुनिक उपचार करून त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले; मात्र परमेश्वराच्या इच्छेपुढे त्यांचा नाईलाज झाला.
तांबे यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि अनेकांना धक्का बसला. नाशिकच्या अमरधाममध्ये नवलनाथ यांना अखेरचा निरोप देण्यासाठी समाजाच्या विविध स्तरांतील हजारो नागरिक उपस्थित होते. सामान्य माणसापासून उच्चपदस्थांपर्यंत सर्वजण तेथे आले होते. हीच त्यांच्या जीवनकार्याची पोचपावती म्हणावी लागेल.
“आडनाव तांबे, पण होते शंभर नंबरी सोनं ” — असेच वर्णन नवलनाथ ऊर्फ मोंटी तांबे यांचे करावे लागेल.
ता. क.
नवलनाथ तांबे यांना गेल्या पाच वर्षापासून खोकल्याचा असह्य त्रास होत होता. प्रदूषित हवेमुळे हा त्रास होत असल्याचे डॉक्टरांचे निदान होते. सततच्या खोकल्यामुळे त्यांची फुप्फुसांवर गंभीर परिणाम झाला होता .
आत्ताच पार पडलेल्या स्वित्झर्लंड देशातील दावोस येथील आर्थिक परिषदेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या माझी मुख्य अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी केलेले भाष्य अत्यंत गंभीर आहे. भारतातील पर्यावरण दुर्लक्षावर त्यांनी लक्ष वेधले आहे. अमेरिकेकडून लादल्या जाणाऱ्या व्यापार निर्बंधांपेक्षा भारतीय शहरातील अत्यंत भिकार दर्जाची हवा हे मोठे संकट आहे असे गीता गोपीनाथ यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
भारतात दरवर्षी 17 लाख लोकांचा मृत्यू केवळ पर्यावरणीय कारणामुळे होतो. हे प्रमाण देशातील एकूण मृत्यूच्या 18% इतके आहे. केवळ खराब हवेमुळे होणाऱ्या आजारांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेस दरवर्षी पंधरा हजार कोटी डॉलरचा फटका बसतो. या प्रदूषित निर्मित व्याधींमुळे एकंदरच समाजाच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. याकडे गीता गोपीनाथ यांनी लक्ष वेधले आहे.
नासिक मध्ये पण दिवसेंदिवस प्रदूषित हवेचे प्रमाण वाढते आहे परत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्याने होऊ घातलेले वृक्षतोड हा चिंतेचा विषय आहे. नासिक मधील नवनिर्वाचित नगरसेवकांनी
प्रदूषणाच्या विषयी गांभीर्याने उपाययोजना करावी यासाठी नागरिकांनी त्यांच्यावर दबाव आणणे आवश्यक आहे.
असे काम होणे ही देखील नवलनाथ तांबे यांना श्रद्धांजली ठरू शकेल.
