
जळगाव निंबायती (वार्ताहर) मोल-मजुरी करुन कुटुंबाचा कसाबसा गाडा हाकणाऱ्या येथील संजय ठोंबरे यांच्या मुलीने गायत्री ठोंबरे हिने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महीला व बाल विकास विस्तार अधिकारी पदाला गवसणी घालुन आई वडीलांच्या कष्टाच्या घामाचं चिज केलं आहे. येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थींनी गायत्री हिने केंद्रीय स्तरावरील पूर्व प्राथमिक शाळा परीक्षेत अंतिम ३५० उमेदवारातून हे उज्वल यश संपादन केले आहे. तालुका स्तरावर एक याप्रमाणे जिल्ह्यातून केवळ पंधरा उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. गायत्रीला तालुक्यातील सर्व पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेंवर केंद्र शासनाच्या विविध प्रशासकीय योजना राबविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गायत्रीचे प्राथमिक शिक्षण येथील जि. प. प्राथमिक शाळेत झाले. तिने बारावी पर्यंतचे शिक्षण गो. य. पाटील विद्यालयातून घेतले. बारावीला गायत्रीने केंदातून प्रथम क्रमांक पटकाविला होता. तद्नंतर तिने शिर्डी येथील महाविद्यालयातून पदवी संपादन केली आहे. तिने कुठलाही क्लास न लावता घरकाम सांभाळून दररोज आठ ते दहा तास अभ्यास करुन पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. एवढ्यावरच न थांबता भविष्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न गायत्रीने यावेळी बोलताना सांगितले. गायत्रीचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासूताई पाटील, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी, सर्व संचालक, विश्वस्त प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात
बारावीला वर्गशिक्षक प्रा. अमोल अहिरे यांनी आयोजित केलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेत व भारतीय संस्कृती परीक्षेत अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावला होता. यातून आत्मविश्वास वाढला, प्रेरणा मिळाली व स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. तसेच सृष्टी देशमुख या आय ए एस अधिकारीपासून प्रभावीत झाले.*गायत्री ठोंबरे, महिला व बालविकास विस्तार अधिकारी*
