
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील २०२६ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील लोकनाट्य क्षेत्रातील तमाशा कलाकार रघुवीर तुकाराम खेडकर यांचा समावेश आहे. खेडकर मूळचे संगमनेरचे आहेत. लोकनाट्य तमाशा क्षेत्राला प्रथमच हा सन्मान मिळत आहे. खेडकर यांच्या रूपाने अहिल्यानगर जिल्ह्याला आणखी एक पद्मश्री मिळाला. “महाराष्ट्रातील लोककलेचा हा सन्मान आहे. हा दिवस पाहण्यासाठी आज आई हवी होती,” अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत खेडकर यांनी दिवंगत तमाशा कलावंत कांताबाई सातारकर-खेडकर यांच्या आठवणी जाग्या केल्या.
खेडकर म्हणाले, ” या सन्मानामुळे माझ्या सात पिढ्यांचा उद्धार झाला आहे. लोकांसाठी, समाजासाठी जे झटलो, त्याची पोचपावती मिळाल्याचा आनंद आहे. तमाशा लोककलेला हा पहिलाच पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मला मिळतोय, हे माझं भाग्य आहे. रसिकांची मी सेवा केली, याची पोचपावती मला मिळाली”.
याशिवाय महाराष्ट्रातीलच अर्मिडा फर्नांडीस यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. परभणीचे प्रयोगशील शेतकरी श्रीरंग लाड यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी कापूस पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष संशोधन केलेले आहे. त्यांच्याच कामाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. पालघरमधील वारlली संगीतकार भिकल्या लाडक्या धिंडा यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.
