
संविधान –
रे माणसा आता तर
माणूस हो जरासा !
आपल्याच वागण्याचा
कर तू जरा खुलासा !! धृ.
आता उण्या दुण्याची
भाषा उगा कशाला !
तक्रार टिका हेवा
अन् दूषणे कशाला !!
सारीच माणसे ही
समजून घे जरासा…..
आपल्याच …..१.
उच नीच कोण कैसे
सारे समान येथे !
माणूसकी वसावी
हृदयी किमान येथे !!
समतेचे पर्व आहे
जाणून घे जरासा…..
आपल्याच…..२.
हे संविधान आपुले
वाचून जरा घेशील !
संदेश एकतेचा
स्वतःलाच जरा देशील !!
त्या कस्तुरेस ही दे
थोडा तरी दिलासा…..
आपल्याच…..३.
रचना—
ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे…..
९५५२०९४०४९.

राष्ट्र-संदेश-गीत.
सौजन्य दीप उजळा
उजळोनी मानसाला !
उजळा विचार आपुले
द्या धीर माणसाला !! धृ.
जीवन अमोल आहे
जगणे अमोल आहे !
विश्वात कुटुंबाला
बघणे अमोल आहे !!
हृदयात सावली तर
जगण्यात अर्थ आला…..
सौजन्य दीप उजळा- १.
भटकू नकोस मित्रा
उद्विग्न नको होवू !
हो मित्र भूतलाचा
तू विघ्न नको होवू !!
सत्कृत्य दान कर तू
बघ स्वार्थ फार झाला…..
सौजन्य दीप उजळा-२.
सर्वांसि प्रेम द्यावे
क्रोधास संपवावे !
आक्रोश दु:ख हिंसा
मनुजास ना दिसावे !!
हातात हात घ्या, द्या,
सोडून संगराला…..
सौजन्य दीप उजळा-३.
तृष्णा अधर्म द्वेषं
जाळील उभा देशं !
आतंक अन् सूडाने
होईल काय पेशं !!
विध्वंस काय कामी
या सावरा धरेला…..
सौजन्य दीप उजळा-४.
लावा सुरूंग तोडा
किल्ले गटागटांचे !
हे वर्ण पंथ जाती
माहेर संकटांचे !!
माणूस सर्व काही
का कस्तुरे म्हणाला…..
सौजन्य दीप उजळा-५.
रचना-
ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे…..
९५५२०९४०४९.
