
सिन्नर : ( प्रतिनिधी) रथसप्तमीच्या पवित्र प्रभातेला सूर्यदेवाच्या तेजाशी नतमस्तक होत सिन्नरमध्ये आयोजित भव्य सूर्यनमस्कार स्पर्धा २०२६ मध्ये बालमनांच्या शिस्त आणि साधनेचे सुंदर दर्शन घडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सिन्नर आणि सूर्य नमस्कार स्पर्धा समिती, सिन्नर यांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था, सिन्नर संचलित सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिर येथील मुलांच्या गटाने एकात्मता व संयमाचे अप्रतिम सादरीकरण करत प्रथम क्रमांकाचा मानकरी होण्याचा गौरव मिळवला.प्राथमिक आणि माध्यमिक असे दोन गट स्पर्धेत सहभागी होते.त्यातील हा पहिल्या गटात इ.४ थीच्या चिमुकल्यांनी विजेते होण्याचा मान मिळवला.
उगवत्या सूर्याप्रमाणे तेजस्वी आत्मविश्वासाने सादर केलेल्या प्रत्येक सूर्यनमस्कारातून विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्य दिसून आले. या स्पर्धेस सदगुरू प्लायवुड ॲण्ड लॅमिनेटेस, सिन्नर यांचे उदार सौजन्य लाभले.

विजेत्या गटास रोख पारितोषिक ₹१०००/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान सिन्नरचे नगराध्यक्ष मा. विठ्ठलराजे उगले यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री नामदेव लोंढे, सेक्रेटरी मा.श्री नामदेव लोणारे तसेच सर्व आदरणीय संचालक मंडळ यांनी विजेत्या बालकांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या दैदीप्यमान यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता राजगुरू यांचे दूरदर्शी मार्गदर्शन तसेच श्रीम.दिपार्ती आहेर यांचा संयमी, सातत्यपूर्ण सराव निर्णायक ठरला. शिस्त आणि आरोग्य यांची सांगड घालणाऱ्या या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिराच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेला नवा गौरव प्राप्त करून दिला.
रथसप्तमीच्या या सुवर्णक्षणी सिन्नरच्या आकाशात उगवलेले हे बालसूर्य उद्याच्या भारताला सशक्त व तेजस्वी बनवतील, असा विश्वास सर्वत्र व्यक्त होत आहे.
