
निफाड | (प्रतिनिधी) तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद मॉडेल स्कूल, नांदगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवला आहे. विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळ सादर करत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

खो-खो (मुली) या क्रीडा प्रकारात शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. तसेच बुद्धिबळ स्पर्धेत श्रेयस ज्ञानेश्वर चतुर याने प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरावर प्रवेश निश्चित केला. याच स्पर्धेत ऋतुराज रवींद्र निकम याने तृतीय क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले.

या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मनोहर नारायणे, मार्गदर्शक शिक्षकवृंद तसेच पालकांचे मोलाचे योगदान लाभले असल्याचे नमूद करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.
