
नाशिक ( प्रतिनिधी ) : साहित्यिकांनी व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवले पाहिजे. जे साहित्य व्यवस्थेच्या विरोधात उभे राहते ते अजरामर ठरते. जे व्यवस्थेला शरण जातात त्यांचं लेखन साहित्य नाही, तर भाटगिरी ठरते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध कवी, संविधान कीर्तनकार शामसुंदर महाराज सोन्नर यांनी नाशिक येथे केले. भारतीय प्रजासत्ताक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने संविधानाचा जागर केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
विश्वात्मा कट्टा, अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्र लेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील कुसुमाग्रज स्मारक येथे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही मान्यवर कवींचा सन्मानही आहे करण्यात आला. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलताना शामसुंदर महाराज पुढे म्हणाले की, साहित्यामध्ये त्या त्या वेळच्या प्रश्नांचे प्रतिबिंब उमटलेले आपल्याला स्पष्ट दिसते. कुसुमाग्रजांच्या क्रांतीचा जयजयकार या कवितेतून स्वातंत्र्यसंग्राम डोळ्यासमोर उभा राहतो, तर नारायण सुर्वे च्या कवितेतून कामगारांचे प्रश्न मांडलेले दिसता, अण्णाभाऊ साठ, शाहीर अमर शेख यांच्या साहित्यात संयुक्त महाराष्ट्राचा लढा दिसतो. अगदी संत साहित्यही त्याला अपवाद नाही. साहित्यातील विविध प्रवाह आपल्याला संत साहित्यात दिसतात. दलित साहित्य, विद्रोही साहित्य, स्त्रीवादी साहित्य, कामगार साहित्य या सर्व साहित्याची मूळ आपल्याला संत साहित्यात दिसतात, असे सांगताना शामसुंदर महाराजांनी विविध संतांच्या अभंगाचे दाखले देत संतानी व्यवस्थेला कसे प्रश्न विचारले हे स्पष्ट केले.
भारतीय संविधानात समता, स्वातंत्र्य बंधुत्व, सामाजिक न्याय ही जी मूल्य दिसतात, त्या मूल्यांचा जागर संतांनी आपल्या साहित्यात केल्याचे जागोजागी दिसून येते याची विविध उदाहरणे शामसुंदर महाराजांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली.
साहित्य संमेलनाचे संयोजक शिवराज पाटील यांनी भारतीय प्रजासत्ताकाच्या पार्श्वभूमीवर आयोजितलेल्या या साहित्य संमेलनामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आपला देश हा कोणत्याही धर्मग्रंथाच्या आधारावर चालणार नाही, तर तो भारतीय संविधानानुसार चालतो. जोपर्यंत भारतीय संविधान मजबूत आहे तोपर्यंत इथली प्रजासत्ताक व्यवस्था कोणीही डळमळीत करू शकणार नाही. म्हणून प्रत्येक साहित्यिकांनी, कवींनी भारतीय संविधानाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
उद्घाटक म्हणून हेमलता गिते, प्रमुख पाहुणे म्हणून जयप्रकाश जातेगावकर, स्वप्नील तोरणे, दिलीप साळुंखे उपस्थित होते. मीनाक्षी गवळी यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले.
