
संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर शाळेत मकर संक्रांती निमित्त महिला सप्तशक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या सौ.गिताताई कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सुचिता करवा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंगला गोविंद अधिक्षिका सौ. अरुणा चोथवे व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.अश्विनी सगर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने झाली. नारी शक्ती, विविधतेत एकता, शक्तीत सौम्यता, विचारात सकारात्मकता, संस्कृतीची जोपासना, सप्तशती व आत्मविश्वासाचा जागर हा कार्यक्रमाचा उद्देश आपल्या प्रास्ताविकेतून मुख्याध्यापिका यांनी सांगितला. अरुणा चोथवे यांनी कार्यक्रमास लाभलेल्या पाहुण्यांचा परिचय करून दिला.महिलांना देवाने किर्ती, श्री, वाक, स्मृती, मेघा, धृती व क्षमा या सात शक्तींची देवी देणगी दिली आहे. त्यांचा वापर त्यांनी आपल्या संसारासाठी व मुलांच्या संगोपन करण्यासाठी करावा. कारण मुलं आपलं अनुकरण करतात, कुटुंबाची कीर्ती, वैभव, लक्ष्मी, संपत्ती, जपली पाहिजे. आपल्या वाणीच्या माध्यमातून कुटुंबाला एकत्र ठेवले पाहिजे. बौद्धिक क्षमता व स्मरणशक्ती वाढवली पाहिजे.

तसेच संसारात संयम ठेवला पाहिजे. आपल्याकडे दुसऱ्यांना क्षमा करण्याची उदरपूर्वक भावना असली पाहिजे. असे मार्गदर्शनपर भाषणातून पाहुण्यांनी माता पालकांना मोलाचा संदेश दिला. सुवर्णा मते यांनी गटगीत सादर केले. सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा पुनम खैरनार यांनी घेतली. तसेच विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या माता पालकांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांनी साकारलेल्या थोर कर्तृत्ववान स्त्रियांची वेशभूषा यामध्ये किरण बेदी, सावित्रीबाई फुले, आनंदबाई जोशी, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर, ताराराणी यांनी उपस्थितांची मनी जिंकली. आई असणं सोपं असतं, पण विशेष आई असणं म्हणजे अपार जिद्द, अमर्याद प्रेम, आणि अखंड संयम लागतो अशा तीन वीर माता श्रीमती भारती भालेराव, सौ. स्मिता थोरात व सौ.लता झनकर यांना मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमास एकूण १५० माता भगिनी उपस्थित होत्या. संकल्प वाचन भारती पाटील यांनी केले. पारंपारिक हळदी कुंकू व उखाणे यांनी कार्यक्रमाची सांगता झाली. जाई रत्नाकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले
