
ओझर: दि. 22 (वार्ताहर)भाषा हा मानवाचा अलंकार असून त्याशिवाय कोणतेही व्यवहार, शिक्षण, देवाणघेवाण आपणास करणे शक्य नाही म्हणून आपण आपल्या मायबोली मराठी भाषेचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. ते मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा दिनानिमित्त ओझर येथील बोरस्ते विद्यालयात बोलत होते. विद्यालयात विविध उपक्रमात अभंग, स्वरचित कविता, व काव्यवाचन सादर करण्यात आले. मुख्याध्यापक सोपान वाटपाडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यालयाच्या गीतमंचने सामूहिक कविता सादर केली. तसेच काव्या काळे इ.सहावी हिने कुसुमाग्रज यांची ‘कणा’ ही कविता सादर केली. ज्येष्ठ शिक्षिका लता आहेर मोनाली निकम वर्षा पाटील शितल आहेर यांनी कविता व काव्य वाचन केले. संगीत शिक्षिका शितल आहेर यांनी उत्कृष्ट कविता गायन केले. प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षिका सरोज खालकर यांनी केले. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे शिक्षक मंगल सावंत संगीता शेटे कीर्ती बच्छाव मनीषा पवार मनीषा मोगल आदी सेवक उपस्थित होते. फलकलेखन कलाशिक्षिका सविता पवार यांनी केले. सूत्रसंचालन मोनाली निकम यांनी केले. आभार क्रीडा शिक्षक प्रभाकर लवांड यांनी मानले.
