
निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील रुई गावचे भूमिपुत्र, स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते, शेतकरी हितासाठी आयुष्य वाहून घेतलेले आणि शेतकरी व प्रशासन यांच्यातील विश्वासाचा सेतू म्हणून ओळखले जाणारे रघुनाथ पाटील तासकर यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने निफाड तालुक्यात केवळ एक व्यक्ती नव्हे, तर शेतकरी–प्रशासन यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
७ ऑक्टोबर १९४३ रोजी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रघुनाथ भिकाजी तासकर यांचे बालपण कठीण परिस्थितीत गेले. अवघ्या दोन वर्षांचे असतानाच आईचे छत्र हरपले. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी वडील व चुलते यांच्या मार्गदर्शनाखाली शेती सांभाळली. चुलते कै. महादु गोपाळा तासकर आणि वडील कै. भिकाजी गोपाळा तासकर यांच्या संस्कारातूनच त्यांच्यातील कर्तव्यभावना, प्रामाणिकपणा आणि समाजभान आकाराला आले.
रुई गावाचे पोलीस पाटील म्हणून जवळजवळ ३५ वर्षे त्यांनी अतिशय निष्ठेने सेवा बजावली. गावातील भांडणे–वाद गावातच मिटावीत, पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरण जाऊ नये, हा त्यांचा ठाम आग्रह असे. त्यामुळे रुई गावात शांतता, सलोखा आणि परस्पर विश्वास टिकून राहिला. अधिकारी वर्गाशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते, मात्र ते कधीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत तडजोडीला तयार नव्हते. शेती, पाणी आणि शिक्षण हे गावाचे तीन मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले.
स्वतःच्या गावात “बळीराजा पाणी वाटप सहकारी संस्था” स्थापन करून ती यशस्वीपणे चालविण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना “सर्वोत्कृष्ट सहकारी पाणी वाटप संस्था पुरस्कार” देऊन गौरविले. बाहेरगावच्या अनेक शेतकऱ्यांना रुई परिसरात शेती मिळवून देण्यातही त्यांचे मोठे योगदान होते.
स्व. शरद जोशी यांच्या सहवासात राहून त्यांनी शेकडो शेतकरी आंदोलनांत सक्रिय सहभाग घेतला. वीज वितरण कंपनीविरोधातील लढे, पाटाच्या पाण्यावर बसविण्यात येणाऱ्या डोंगळ्यांविरोधातील आंदोलने – या सर्वांत ते नेहमी अग्रभागी असत. अन्यायासमोर झुकण्यापेक्षा त्यांनी पोलीस पाटील पदाचा राजीनामा देण्याचा धाडसी निर्णय घेतला. पदापेक्षा शेतकऱ्यांचा न्याय महत्त्वाचा, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
नि:स्वार्थी, कष्टाळू, मनमिळाऊ, प्रेमळ, शिस्तप्रिय आणि मदतीस सदैव तत्पर असलेले तासकर कुटुंबातच नव्हे, तर संपूर्ण रुई गावात आदराचे स्थान मिळवून होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले – अनिल, बाळासाहेब, रमेश, चार मुली – शोभा, उज्वला, ज्योती व सविता, तसेच नातवंडांचा मोठा परिवार आहे.
मंगळवार, दि. १३ रोजी संत निवृत्ती महाराज–त्र्यंबकेश्वर यात्रेच्या पायी दिंडी प्रवासात सहभागी होण्यासाठी जणू भक्तीच्या वाटेवरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवार, दि. २२ रोजी रुई येथे होणाऱ्या त्यांच्या दशक्रिया विधी निमित्ताने पंचक्रोशीतील शेतकरी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
“असेन मी,
नसेन मी,
कार्यातून दिसेन मी”
या ओळी त्यांच्या जीवनाचे सार सांगतात. आज ते आपल्यात नसले, तरी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उभा राहणारा, प्रशासनाशी निर्भीडपणे संवाद साधणारा आणि समाजासाठी झटणारा त्यांचा वारसा कायम “प्रेरणादायी” राहील.
“वै. रघुनाथ पाटील तासकर” यांना पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांच्या वतीने “भावपूर्ण श्रद्धांजली.”
दशक्रिया विधी
गुरूवार दि. २२/१/२०२६ रोजी सकाळी- ८.३० वा. रुई ता. निफाड
