लेखक:- रतन पिंगट,येवला

महाराष्ट्राचा मानाचा स्तंभ म्हणून ओळखले जाणारे गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित, नाशिकमध्ये नुकतेच ४थे शेकोटी लोककला मराठी साहित्य संमेलन पार पडले.हे संमेलन तब्बल 48 तासांचे होते. 17 आणि 18 जानेवारीला पार पडलेल्या या संमेलनात महाराष्ट्रात लोप पावत असलेल्या अनेक लोककलांचा जागर करण्यात आला. त्याचबरोबर बालकवी कट्टा, गझल कट्टा, निमंत्रितांचे कवी संमेलन, नवोदितांसाठी शेकोटी कवी संमेलन, तारपा वाद्य, लावणी स्पर्धा, परिसंवाद आणि अशा अनेक सांस्कृतिक चळवळीचा इतिहास ठरलेलं हे सहित्य संमेलन आगळं वेगळं ठरलं. हे शेकोटी लोककला साहित्य संमेलन आगळ वेगळं ठरलं ते माणसं जपणारा, माणसावर प्रेम करणारा सुरेश पवार नावाच्या "माणूस मित्र" यांच्या संकल्पनेतून..
खरंतर मुलीचं लग्न काढताना बापाला जेव्हढा बारीक सारीक गोष्टींचा विचार करवा लागतो तसंच असतं संमेलनाचं. संमेलनासाठी येणारे कलावंत असो की रसिक प्रत्येकाची भेट घेणे, कार्यक्रम पत्रिकेनुसार नियोजित कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडणे, वाटतं तितक सोपं नसतं. पण हा माणूस पायाला भिंगरी बांधल्यासारखं संमेलन यशस्वी होण्यासाठी किती तळमळीने, किती हलक्या पावलाने फिरत होते हे आम्ही सर्वांनी पाहिले. खरंतर त्यांचे पावले जड झालेली मी कधीही पाहिली नाहीत.
महत्त्वाचे म्हणजे हे सर्व सांगण्याआधी मला जे सांगायचं आहे ते वेगळे आहे. 48 तासांचे संमेलन झाले आणि मला वाटले आदरणीय दादांना फोन करून चौकशी करावी.आराम झाला की विचारावा.परंतु मी शाळेतून घरी परतत असताना दादांचा फोन आला आणि त्यांनीच माझी चौकशी केली. थोडे खजिल वाटले. सहजच म्हटलं झाला का आराम दादा, तर ते कुठल्याही मंचावर न दिसता दादा दिसले थेट शेतातच. आश्चर्य वाटले. दादा शेतात पिकाला पाणी भरत होते.
कुठेतरी माझ्या वाचनात आले होते एक संपूर्ण स्री जीवन समजून घ्यायचे असेल तर एक जन्म अपुरा आहे. आणि म्हणून मी दादांना म्हटलं तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मला अजून किती वर्षे लागतील सांगता येणार नाही. दादांच्या चेहऱ्यावरील हास्य खूप काही सांगून जात होते. काल ज्यांनी माणसांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ निर्माण केली, आज तेच जमिनीत हिरव्या स्वप्नांना तितक्याच जोमाने हातात फावडे घेऊन फुलवित होते.
४८ तास अखंड जळणारी शेकोटी केवळ लाकडांची नव्हती, ती विचारांची, शब्दांची आणि माणुसकीची होती.शेकोटी लोककला मराठी साहित्य संमेलन यशस्वी करताना त्यांच्या कपाळावर श्रमाचे मोती होते,आणि डोळ्यांत समाधानाची शांत झुळूक. संमेलन संपले, टाळ्यांचा गजर थांबला,पण त्यांचा दिवस संपला नाही. एकही दिवस विश्रांती न घेता
ते थेट शेताकडे वळले, कारण त्यांना माहीत आहे मातीशी नातं तुटलं तर माणसाशीही तुटतं.पिकाला पाणी भरताना ते केवळ शेती करत नव्हते, ते श्रमाला प्रतिष्ठा देत होते, आणि संस्कृतीची मुळे जपत होते. साहित्याच्या मंचावर जितके ते विनम्र, तितकेच शेताच्या बांधावर. तेही कणखर आणि निष्ठावान राहून. सुरेश पवार दादा म्हणजे विचारांचा दीप हातात घेऊन अंधारात चालणारा माणूस आणि वाटेवर येणाऱ्यांना प्रकाश देणारं व्यक्तिमत्व. अशा व्यक्तीमुळेच साहित्य जिवंत राहते, संवेदना शाबूत राहतात, आणि माणूस माणसाशी जोडला जातो. जो माणूस माणसावर प्रेम करतो, तो मातीवरही प्रेम करतो.आणि जो माणूस माणसांना जगवतो,तो पिकांनाही हिरवे ठेवतो.सुरेश पवार दादा हे फक्त एक नाव नाही तर ते माणुसकी आणि मातीतला सुंदर सेतू आहे. हा सेतू महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील कलावंतांना प्रकाशात आणण्याचे काम अविरत करत असताना आपली नाळ मातीशीही घट्ट धरून ठेवत आहे.
नाशिकच्या मातीतून उगवलेलं एक सुंदर स्वप्न आणि लोकसांस्कृतिक चळवळीचा पाईक, “माणूस मित्र” म्हणजेच आदरणीय सुरेश पवार. दादा म्हटलं की कुणास ठाउक या ओळी नकळत ओठावर येऊन जातात…
“रंगुनी रंगात सारे रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!”
दादा आपल्या कार्याला सलाम 🌿🙏🙏
✒️रतन पिंगट, येवला
