
ओझर दि. 20 वार्ताहर
नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, नाशिक जिल्हा परिषदेच्या निफाड तालुक्यातील आयुष्मान आरोग्य मंदिर’ ओझर प्राथमिक आरोग्य केंद्रांला केंद्र सरकारचे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) प्रमाणपत्र जाहीर झाले आहे.भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्रा’द्वारे (NHSRC) नुकताच हा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील ओझर आरोग्य केंद्राने यश मिळवले आहे आयुष्मान आरोग्य मंदिर – प्राथमिक आरोग्य केंद्र,ओझर ता.निफाड या केंद्राने 90.24% इतका उच्चांकी गुणांक मिळवून ‘क्वालिटी सर्टिफाईड’ मानांकन प्राप्त करून राष्ट्रीय पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तपासणीचे निकष:
या केंद्रांची बाह्य तपासणी डिसेंबर २०२५ मध्ये केंद्र शासनाच्या आरोग्य तज्ज्ञ समितीमार्फत करण्यात आली होती.यामध्ये बाह्य रुग्ण विभाग (OPD), प्रसूती कक्ष (Labour Room), प्रयोगशाळा (Lab), आंतररुग्ण विभाग (IPD), राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम (NHP) आणि सर्वसाधारण सेवा अशा विविध विभागांची कसून तपासणी करण्यात आली. रुग्णांचे हक्क, सेवांची उपलब्धता, संसर्ग नियंत्रण आणि रुग्णांचा समाधान निर्देशांक (Patient Satisfaction Score) या सर्व निकषांवर या दोन्ही केंद्रांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या प्रमाणपत्रामुळे या आरोग्य केंद्रांना आता केंद्र सरकारकडून त्यांच्या अधिक सक्षमीकरणासाठी अतिरिक्त निधी (Incentives) देखील प्राप्त होणार आहे, ज्याचा विनियोग सोयी-सुविधा वाढवण्यासाठी केला जाईल. केंद्र सरकारचे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) प्रमाणपत्रासाठी जिल्हास्तरीय मार्गदर्शन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे , जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.हर्षल नेहेते, साहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र बागुल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिपक लोणे यांचे समवेत तालुका आरोग्य अधिकारी निफाड डॉ सुजित कोशिरे,ओझर नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किरण देशमुख, डॉ वैशाली कदम, डॉ निलेश चव्हाण, Nqas चे डॉ निशिगंधा महाले, प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर चे वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद सुर्वे, डॉ प्राची पवार, डॉ मंजिरी सराफ, आपला दवाखाना चे वैद्यकीय अधिकारी डॉ रिद्धी पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ प्रतिभा जुनागडे यांची समवेत ओझर आरोग्य केंद्राच्या सर्व आरोग्य कर्मचारी, आशा गट प्रवर्तक, आशा ताई, सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग कटिबद्ध असून या मानांकनामुळे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रावर जनतेचा विश्वास अधिक वृद्धिंगत होईल या यशाचे श्रेय प्राथमिक आरोग्य केंद्र ओझरचे सर्व वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी आशा आणि जिल्हा गुणवत्ता कक्षाला जाते.

जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, डॉ सुधाकर मोरे
