
रानवड महाविद्यालय आयोजित पालक मेळाव्यात पालकांशी संवाद सादताना कवयित्री शकुंतलाताई बाळासाहेब वाघ
नाशिक रोड ( प्रतिनिधी ) विद्यार्थ्याच्या विकासासाठी शिक्षक आणि पालक यांच्यात संवाद होणं अतिशय गरजेचा आहे. विद्यार्थ्याच्या जडणघडणीवर त्याचा सकारात्मक परिणाम घडत असतो. आजचं युग हे स्पर्धेचं आहे. जीवन अतिशय गतिमान होत आहे. त्यामुळे अशा काळात पालकांनी जागरूक होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास घडून आला तरच स्पर्धेच्या युगात तो टिकाव धरेल. आर्थिकदृष्ट्या तो स्वावलंबी तर झालाच पाहिजे; त्याच बरोबर समाजात एक संवेदनशील नागरिक म्हणूनही घडला पाहिजे. असे प्रतिपादन के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त व कवयित्री शकुंतलाताई बाळासाहेब वाघ यांनी केले.
के. के. वाघ शिक्षण संस्थेचे के. के. वाघ महाविद्यालय रानवड येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एल. जाधव म्हणाले, पालक म्हणजे केवळ एक जबाबदारी नाही तर आदर्श पालकत्व म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. पाल्याला घडवताना आपल्यातला पालक घडत जातो. त्याच्या भवितव्याचा विचार करून त्याच्या भविष्याचा वेध घ्यायचा असतो. म्हणून त्यांच्यातला संवाद महत्वाचा; तो होत राहिला पाहिजे. हाच हेतू ठेवून या पालक मेळाव्याचे आयोजन केले आहे.
डॉ. प्रतिभा बाहेकर यांनी पी. पी. टी. सादरीकरणातून महाविद्यालयाची यथोचित माहिती पालकांना दिली.
उपस्थित पालक दिगंबर मत्सागर, संजय बुचकुले, माधव ढोमसे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलेश आहेर, तर आभार पालक मेळावा समन्वयक प्रा. ऐश्वर्य पाटेकर यांनी मानले. कार्यक्रम महाविद्यालय विकास समिती सदस्य रामनाथ पानगव्हाणे, प्रभारी प्राचार्य डॉ. अतुल गवारे, आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. मिलिंद पवार, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक बहुसंख्येनं उपस्थित होते.
