मराठी नाटकाला दोनशे वर्षांपेक्षा जास्त काळाची प्रदीर्घ परंपरा आहे . अनेक नाटके लिहिली जातात आणि सदर केली जातात परंतु यात स्त्री नाटककाराची संख्या खूप कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन स्त्री नाटककारांचा शोध घेणे, त्यांनी लिहिलेली नाटके वाचून त्यावर मार्गदर्शन करणे आणि स्त्री नाटककारांना प्रोत्साहन देण्यासाठी बोधी नाट्य परिषद मुंबई यांनी ४९ व्या नाट्य लेखन कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
मराठी नाटक अधिक समृद्ध व्हावे या हेतूने गेली तेवीस वर्षे सातत्याने महाराष्ट्रभर बोधी नाट्य परिषद, मुंबई "नाट्य लेखन कार्यशाळा" घेत आलेली आहे. ही ४९ वी बोधी नाट्यलेखन कार्यशाळा वेगळी असून केवळ स्त्री नाटककारांसाठी आयोजित केली आहे . या नाट्यलेखन कार्यशाळेत केवळ स्त्री नाटककारच आपली नाटके वाचणार आहेत.
या कार्यशाळेचे उदघाटन नाटक या विषयाला वाहिलेल्या 'रंगवाचा' या त्रैमासिकाचे संपादक , मान. वामन पंडित करणार असून, अध्यक्षपदी प्रा. डॉ. सुरेश मेश्राम असतील. विशेष अतिथी म्हणून, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मान. मीनल जोगळेकर उपस्थित राहणार आहेत. केवळ स्त्री नाटककारच आपल्या नाट्यकृती वाचणार असलेल्या या कार्यशाळेविषयीची भूमिका नाटककार प्रेमानंद गज्वी स्पष्ट करतील.
या नाट्यलेखन कार्यशाळेत 'ही वाट दूर जाते', (डॉ. अनघा राजपूत , लातूर), 'आस्था', (ऋतुजा आरती बडवे, कोल्हापूर) ; "झुळूक', (मेधा देशमुख, पुणे), 'रेड डाॅट' (उर्मी , कल्याण ) या चार स्त्री नाटककार सहभागी होणार आहेत.
या कार्यशाळेत वाचलेल्या नाटकावर मान्यवर नाट्य अभ्यासक / रंगकर्मी अरूण कदम, गिरीश पतके, डॉ.अनिल बांदिवडेकर, अभिराम भडकमकर, प्रा डॉ.मंगेश बनसोड, प्रा मिलिंद इनामदार, नीळकंठ कदम, अशोक हंडोरे, भालचंद्र कुबल, राजीव जोशी , राम दौंड, प्रा डॉ प्रदीप सरवदे आदी चर्चा करतील. लेखन आणि तांत्रिक बाबतीत मार्गदर्शन करतील.
ही ४९ वी नाट्य लेखन कार्यशाळा, पु.ल.देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी आणि बोधी नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा शनिवार दिनांक १७ जानेवारी आणि रविवार दिनांक १८ जानेवारी २०२६ असे दोन दिवस सकाळी १०.३० ते सायं. ५.३० या कालावधीत होईल. ही कार्यशाळा प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सभागृहात होणार असून ही कार्यशाळा विनामूल्य आहे. तथापि नांव नोंदणी करणे बंधनकारक आहे. नाव नोंदणी करण्यासाठी कृपया प्रेमानंद गज्वी ( 9821771884 ) यांचेशी संपर्क करावा .