
लेखन:- ॲड. अर्चना आढाव, नांदगाव
मोबाईल क्रमांक :- 9403239293
“नांदगाव नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष, गटनेते व नगरसेवक यांचे मनःपूर्वक अभिनंदन…..
नांदगाव नगरपालिकेच्या विकासासाठी मला असे वाटते की, नांदगाव नगरपालिका डिजिटल होण्यासाठी, जनताच नगरसेवक असा ग्रुप नगरपालिकेने चालू करून त्यावर नांदगाव नगरपालिका मधील नागरिकांना जॉईन करून वेळोवेळी असणाऱ्या सूचना या ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांना द्याव्यात. म्हणजे नांदगाव नगरपालिका डिजिटल होईल. उदाहरणार्थ नळपट्टी, पाणीपट्टी यासारखे बिले वाटण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज भासणार नाही. व बिलबुकाचा खर्चही वाचेल. नांदगाव मधील स्ट्रीट लाईटच्या पोलवर नंबर टाकावेत. म्हणजे त्या पोलचा फोटो काढून ग्रुप वर टाकल्यास तो दुरुस्त करता येईल. यासाठी तक्रार बुक व कर्मचारी यांची बचत होईल. या नंबरमुळे नांदगाव नगरपालिकेतील स्ट्रीट लाईटची संख्या नागरिकांना कळेल. व यासाठी नगरपालिकेस लाईट बिल चा किती खर्च येतो, हेही कळेल. या ग्रुप वर उद्या कोणत्या प्रभागात पाणी येणार आहे, हे कळवता येईल. त्यामुळे नागरिकांना सुविधा होईल. तसेच घंटागाडी कोणत्या प्रभागात, कोणत्या वेळेस येईल हेही कळवता येईल. तसेच गटारी व रस्ते स्वच्छ झाल्याचे त्या त्या प्रभागाचे फोटोही या ग्रुप वर टाकता येईल. म्हणजे कोणत्याही प्रभागावर अन्याय होता कामा नये. आणि सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला नळ कनेक्शन देऊन ज्या प्रभागात पाणी पुरवठा केला जातो, त्या प्रभागात स्वच्छता कर्मचारी पाठवून तेथील सार्वजनिक शौचालय वेळोवेळी स्वच्छ करावे. म्हणजे सार्वजनिक आरोग्य सांभाळता येईल व शौचालयाच्या बाजूचा परिसरही कचरामुक्त होऊन डास मुक्तही होईल. नगरपालिका हॉलमध्ये वेळोवेळी महापुरुषांच्या जयंती कर्मचारी व नगरसेवक यांच्यासोबत साजऱ्या कराव्यात. नांदगाव मधील भाजीपाला विक्रेते व टपरीधारक यांची योग्य सोय करून नांदगावच्या रस्त्यांना मोकळा श्वास घेता येईल असे काम करावे. व त्यातूनच नांदगाव नगरपालिकेला आर्थिक लाभ होईल, याचाही विचार करावा. आपल्या नगरपालिकेकडे आग लागल्यास अग्निशमन गाडी नाही, आणि ती गाडी प्रत्येक गल्लीत जाईलच असेही नाही… त्यासाठी नगरपालिकेच्या पाण्याच्या पाईपलाईन वर हायड्रंट किंवा नळ कनेक्शन जागोजागी काढून ठेवावेत, म्हणजे आग लागल्यास त्याचा त्वरित उपयोग होईल व मोठी हानीपासून बचाव होईल. नांदगावच्या इतिहासातील नांदगावचे प्रवेशद्वार म्हणजे वेश यांचे पुनर्निर्मान करावे .त्यामुळे नांदगावची सुंदरता वाढेल. शनी मंदिर चा प्रवासी थांबा स्थलांतर करून तो हुतात्मा चौकात न्यावा, त्यामुळे शनि चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. व हा थांबा सीसीटीव्हीच्या नजरेत असावा. जेणेकरून विद्यार्थिनींची छेड काढणारे यामध्ये कैद होतील. तसेच शनी मंदिरच्या ऐतिहासिक विहिरीचा विकास करून पूल व गार्डन ला लागून घाट निर्माण करून तेथे नागरिकांना दशक्रिया विधीची सोय करावी. तसेच दुसरा घाट हा नगरपालिका इमारतीच्या पाठीमागे असावा, कारण तेथेही शाकंभरी तीर आहे तेथे संरक्षण भिंत बांधून तेथे घाट बांधावा व तेथेही नागरिकांसाठी बसण्यास मोकळी जागा आहे तेथे विहीरही आहेत किंवा बोर करूनही पाण्याची सोय होऊ शकते व महत्त्वाचे म्हणजे या जागेचा रात्रीचा वेळेस होणारा दुरुपयोग कमी होईल. नांदगाव शहर हद्दीतील शासकीय आयटीआय व न्यायालय यांच्यामधील शासकीय जागेवर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नावाने क्रीडा संकुल व स्टेडियम बांधून विद्यार्थी व विद्यार्थिनींना खेळाची आवड निर्माण होऊन विविध स्तरावर खेळाडू निर्माण होतील. याच प्रमाणे नांदगाव मधील रेल्वे इन्स्टिट्यूट रेल्वे कडून भाडेपट्ट्याने घेऊन तेथे या भागातील विद्यार्थी जेष्ठ नागरिक यांच्यासाठी मनोरंजन गार्डन अभ्यास यांची सुविधा निर्माण करावी… असा विकास झाल्यास भविष्यात आमदार सुहास अण्णा कांदे यांची हॅट्रिक होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही इतिहास घडणारच, इतिहास घडणारच, इतिहास घडणारच जय महाराष्ट्र
