
लासलगाव (प्रतिनिधी ) आजच्या धावपळीच्या युगात आरोग्य, निसर्ग आणि नातेसंबंध जपणे ही काळाची गरज आहे. पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा. मोकळ्या जागेत फळझाडे लावावीत. बाहेरचे अन्न न खाता घरगुतीच अन्नपदार्थ द्यावे. आई-वडील व गुरुजनांचा आदर करावा. वयोवृद्ध व्यक्तींना जपा व त्यांना वेळ द्या, सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी सर्वांनी मिळून योगदान द्या आणि दुसऱ्याचा मत्सर कधीच करू नका. जीवनात या सात चांगल्या सवयी अंगीकारल्यास व्यक्ती आणि समाज दोन्हींचा विकास होईल, असे प्रतिपादन पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.

येथील लासलगाव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नू.वि.प्र.मंडळाचे अध्यक्ष ॲड.अंबादास आवारे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर, चेअरमन प्रकाश पाटील, जयवंतराव जाधव, हसमुखभाई पटेल, भाऊसाहेब रायते, ॲड.संदीप होळकर, संजय पाटील, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे, कला मंडळ प्रमुख किशोर गोसावी, पर्यवेक्षक उज्वल शेलार, मच्छिंद्र साबळे, कैलास साबळे, डॉ.अरुण काळे, चंद्रकांत ठोके, सुधीर होळकर, मयूर होळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजनाने झाली. त्यानंतर स्वागतगीत सादर करण्यात आले.

प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांनी अहवालवाचन केले, तर प्रा.किशोर गोसावी यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी गुणवंत प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा.अश्विनी पवार व प्रा. गणेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.सुनिल गायकर यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
