नाशिकरोड ( प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-बहि:शाल शिक्षण मंडळाच्या ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष आणि शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय कार्यशाळा संस्थाध्यक्ष जयराम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली विविध व्याख्यानांनी संपन्न झाली.
युवावक्ते डॉ.प्रसाद जोशी यांनी 'जग जिंकू या संवादाने' या विषयावर प्रथम पुष्प गुंफले. आदर्श आणि परिणामकारक संवादासाठी भाषा, शब्द आणि देहबोली हे महत्त्वाचे घटक आहेत. संवादाने जग जिंकता येणे अवघड नाही, असे सांगितले. दुसरे पुष्प प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ अमोल कुलकर्णी यांनी 'नाद योगा:साऊंड-हिलींगचे जादुई शास्त्र' या विषयावर प्रात्यक्षिकांसह गुंफले. ध्वनी कंपनांचे शरीर आणि मनावर होणारे सुपरिणाम, तसेच त्याद्वारे पूर्णपणे बरे होणारे मनोकायिक आणि शारीरिक आजार यावर आपले विचार मांडले.
तिसरे पुष्प रमाकांत देशपांडे यांनी 'विश्वातील आश्चर्य आणि अंधविश्वास' या विषयावर आपले विचार मांडले. धूमकेतू, मंगळ, शनि, गुरु आणि ग्रहण या रुढी आणि संकल्पना बदलण्याविषयी आपले शास्त्रीय विचार व्यक्त केले. कार्यशाळेचा समारोप डॉ. सुषमा दुगड यांच्या 'हास्ययोग आणि आरोग्य' या विषयावरील सप्रयोग व्याख्यानाने झाला.
अध्यक्ष जयराम कुलकर्णी आणि उपाध्यक्षा सुनंदा गोसावी यांनी भाषणात सर्व वक्त्यांच्या विचारांचा गौरव केला. ज्योती जोशी आणि मृणाल प्रभुणे यांनी प्रारंभी सरस्वती स्तवन सादर केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी सचिव आणि केंद्रकार्यवाह अविनाश गोसावी, खजिनदार दत्ता कुलकर्णी उपखजिनदार शरद वैद्य, परमेश्वर चिंतकिंदी, उपसचिव श्रीकांत मोहरील, उपसचिव मेखला रास्वळकर, सुधाकर सोनवणे, दिलीप भिंगारकर, राम कुलकर्णी, चंद्रकांत झाडीकर, प्रकाश भालेराव, शिरीष लघाटे, वैदेही कुलकर्णी, शालिनी डहाळे, स्मीता जोशी, मंगल मोहरील, डॉ.कुसुम कुंटे, जयश्री नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.
वैजयंती डांगे, सुधा डमरे, मृणाल प्रभुणे आणि सुनंदा गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. रेखा नाशिककर, ज्योती जोशी, सुधाकर सोनवणे यांनी आभार मानले.