
नाशिक: ‘साहित्यकणा फाउंडेशन’च्या वतीने १ फेब्रुवारी २०२६ रोजी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अकोला येथील ज्येष्ठ साहित्यिक सुरेश हरिभाऊ पाचकवडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय गोराडे यांनी दिली आहे.

सुरेश पाचकवडे हे मराठी साहित्यातील एक प्रगल्भ नाव असून, त्यांच्या ‘गोंदणवेणा’ या कथासंग्रहास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ‘सावली’, ‘ग्रीष्मपर्व’, ‘कधीतरी’ हे काव्यसंग्रह आणि ‘वाटा मुकेपणाच्या’, ‘देहाक्षरं’ यांसारखे कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक महत्त्वपूर्ण साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवले असून, अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला आहे.
हे संमेलन समर्थ मंगल कार्यालय, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे पार पडणार असून, संमेलनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्यिक डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते होणार आहे. अशा दोन दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याचे नियोजन जय्यत सुरू असल्याची माहिती संस्थेचे सचिव विलास पंचभाई यांनी दिली आहे
