
जातेगाव:( प्रतिनिधी )जनता विद्यालय, जातेगाव येथे भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘बालिका दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. धुळे पी. के. यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.मुख्याध्यापक श्री. धुळे पी. के. यांनी सावित्रीबाईंच्या संघर्षाचा इतिहास मांडला. ते म्हणाले, “सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणाची मशाल पेटवली. त्यांनी सोसलेल्या कष्टांमुळेच आज ग्रामीण भागातील मुली उच्च शिक्षण घेऊ शकत आहेत. त्यांचे जीवन हे केवळ स्त्रियांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. श्री सचिन अहिरे सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती सांगताना ते म्हणाले”आज मुली ज्या सन्मानाने शाळेत येत आहेत, त्याचे पूर्ण श्रेय सावित्रीबाईंना जाते. त्यांची खरी जयंती तेव्हाच साजरी होईल, जेव्हा प्रत्येक मुलगी सुशिक्षित, स्वावलंबी आणि निर्भय बनेल.”
”शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” – हे विचार सावित्रीबाईंनी प्रत्यक्ष कृतीत आणून दाखवले.तसेच
यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत त्यांचे विचार मांडले. काहींनी कविता आणि भाषणांतून सावित्रीबाईंच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग जिवंत केले. ‘शिक्षण हेच प्रगतीचे साधन आहे’ हा संदेश यामधून देण्यात आला.
या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार शाळेतील शिक्षक श्री मराठे एस. एम यांनी केले.
