
सिन्नर (प्रतिनिधी )जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोळे येथे सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन, वेशभूषा व बालिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या बालसभेच्या अध्यक्षस्थानी श्रुती नवनाथ आंधळे ही सहावीची विद्यार्थिनी होती. याप्रसंगी आरोही सागर खताळे व आरोही प्रमोद गोरे या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधले. बालसभेचे प्रतिनिधी व शिक्षकांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी झालेल्या बालसभेत काजल खताळे, मानसिक कराड, वैष्णवी शिरसाठ, स्वराज आव्हाड, आरोळी खताळे, स्वराज कराड, समृद्धी खताळे, पूर्वा कराड, कोमल कराड, अक्षदा खताळे आदींनी सावित्रीबाईंच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी बालिका दिनाचे महत्त्व सांगितले. यानंतर गावातील ज्या कुटुंबात केवळ बालिका आहेत अशा कुटुंबातील 11 बालिका व पाच शिक्षिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक वसंत गोसावी यांच्या संकल्पनेतून “लेक वाचवा लेक शिकवा” या अभियाना अंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.

यावेळी त्यांनी बालिकांचे समाजातील महत्त्वाचे स्थान यावेळी स्पष्ट केले. सावित्रीबाई फुले जयंती दरवर्षी 3 जानेवारी रोजी साजरी केली जाते, कारण याच दिवशी १८३१ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि समाजसुधारक होत्या, ज्यांनी पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि स्त्री शिक्षणाचे कार्य केले. त्यांच्या कार्यामुळे महिला आणि दलित समाजाला शिक्षणाची संधी मिळाली, म्हणून त्यांच्या जयंतीला बालिका दिन किंवा महिला मुक्ती दिन म्हणूनही ओळखले जाते. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक वसंत गोसावी, सुनिता बर्वे, कैलास पवार, मीना सोनवणे, स्वाती खताळे, प्रतिभा पवार, सुनिता खताळे आदी उपस्थित होते. बाल सभेच्या प्रतिनिधी ईश्वरी खताळे व स्वरांगी आंधळे यांनी सुत्रसंचलन करून आभार मानले.
