
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील विद्यालयात भारतीय स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमातून सावित्रीबाईंच्या कार्याचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षिका बी. बी. दुकळे होत्या. समवेत प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

महिला मुक्ती दिन तथा बालिकादिन कार्यक्रमावेळी सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थींनीच्या सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ‘मुलींसाठी शाळा उघडताना फुले दाम्पत्यास आलेल्या अडचणी, समाजाचा विरोध आणि त्यांच्या कार्याचे महत्त्व दर्शवणारी नाटीकेचे सादरीकरण करण्यात आले. तसेच स्त्री सक्षमीकरण जनजागृतीपर समूह नृत्य, भाषणे, गीत, पोवाडा आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी इयत्ता ५ वी च्या स्वरा किशोर ढोणे हिने सावित्रीबाईंची तर ८ वीच्या श्रावणी सचिन दुकळे हिने ज्योतिबांची केलेली वेशभूषा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. प्रास्तविक नरेंद्र अहिरे यांनी केले, सूत्रसंचालन ए. एम. साळुंके यांनी केले तर आभार प्रा. अमोल अहिरे यांनी मानलेत.
