
नाशिक (प्रतिनिधी):- माजी आमदार आणि ज्येष्ठ साहित्यिक नानासाहेब बोरस्ते यांनी आपल्या दोन्हीही पुस्तकांत वैविध्य हाताळले आहे. या संग्रहातील कवितेला तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान आहे. शिवाय या संग्रहांतील कविता शब्दबंबाळ नाहीत. या कवितांत साध्या-सोप्या शब्दात जगण्यावर संयत शब्दांत भाष्य केलं आहे, असे प्रतिप्रादन सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांनी केले.
मु.शं.औरंगाबादकर सभागृहात माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या पुणे येथील वैशाली प्रकाशन प्रकाशित ‘आनंदाचे ठायी’ या काव्यसंग्रहाचा आणि ‘नाना तरंग’ या चारोळी संग्रहाचा प्रकाशन सोहळा रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून प्रा . फडके बोलत होते. मंचावर लेखक नानासाहेब बोरस्ते यांच्यासह मविप्रचे माजी अध्यक्ष अरविंद कारे, ज्येष्ठ विनोदी साहित्यिक नरेश महाजन, प्रा.गंगाधर अहिरे, विवेक उगलमुगले, सुरेश पवार, डॉ.उन्मेष पोतदार उपस्थित होते.
ॲड.भगीरथ शिंदे म्हणाले की, या संग्रहातील कवितेला एक वैचारिक आणि नैतिक मूल्य आहे. समाजातील अनेक प्रश्नांसह समाजाची आजची परिस्थिती कवी बोरस्ते यांनी आपल्या कवितांमध्ये मांडली आहे. शेती, शिक्षण, समाजकारण अशा विविध क्षेत्रांमध्ये नानासाहेब बोरस्ते यांनी काम केल्यामुळे त्यांच्या कविता अधिक सजग झाल्या आहेत.
यावेळी मनोगत व्यक्त करताना विवेक उगलमुगले म्हणाले की, या पुस्तकातील कवितांमध्ये शुद्ध मनाची मशागत करण्याची ताकद आहे. विनोदाची सूक्ष्म जाण आणि सामान्य माणसाच्या जगण्याची तळमळ आहे. प्रा.गंगाधर अहिरे यांनी दोन्ही संग्रहांची अत्यंत चपखल शब्दांत ओळख करून दिली. ते म्हणाले की, आजच्या वैविध्यपूर्ण भोवतालातून या कवितेची निर्मिती झाली आहे. या कवितांमध्ये ग्रामजीवनातील नांगराचा फाळ आणि कष्टकऱ्यांच्या पोटातला जाळही आहे. तर नरेश महाजन म्हणाले की, ‘नाना तरंग’ या पुस्तकातील चारोळ्यांमध्ये अर्थपूर्ण आशय दडलेला आहे. या चारोळ्यांमध्ये कवीने विविध विषय हाताळले आहेत. कवी नानासाहेब बोरस्ते यांनी आपल्या मनोगतात गावातील एकशिक्षकी शाळेत शिकत असताना गावातील विविध कार्यक्रमांतून ऐकलेलं नंतरच्या काळात साहित्यात आल्याचे सांगत आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला.
ज्येष्ठ रंगकर्मी जयप्रकाश जातेगावकर आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ.कैलास कमोद यांचा साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल प्रकाशक संघाच्या नाशिक शाखेतर्फे तसेच ज्येष्ठ साहित्यिक तु.सी.ढिकले, मुखपृष्ठकार ज्ञानेश बेलेकर आणि सचिन पगारे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सुरुवातीला ‘निमंत्रितांची काव्यसंध्या’ या प्रयोगाचा चौथा भाग सादर करण्यात आला. त्यात गीतकार मिलिंद गांधी, प्रा.डॉ.गणेश मोगल, दत्ता सोनवणे, अशोक पाटील यांच्यासह कविसंमेलनाच्या सूत्रसंचालिका डॉ.अंजना भंडारी यांनी सादर केलेल्या कवितांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. साहित्य रसिकांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य राजेश्वर शेळके यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र उगले यांनी आभार मानत पसायदान सादर केले.
