
नाशिक( प्रतिनिधी): महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागील तीस वर्षांपासून ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’, ‘द दारूचा नव्हे तर द, दुधाचा’ अशा प्रकारचे विविध प्रबोधनपर कार्यक्रम सातत्याने राबवित आहे. २०२५ या वर्षाला निरोप व २०२६ या नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक शाखेच्या वतीने ‘द दारूचा नव्हे, तर द, दुधाचा’ हा प्रबोधनपर कार्यक्रम नाशिक मधील हुतात्मा स्मारकाच्या प्रवेशद्वारावर राबविण्यात आला. यावेळी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना बोलावून, थांबवून त्यांना व्यसनाचे दुष्परिणाम सांगण्यात आले आणि मसाला दुधाचे मोफत वाटपही करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. व्यसन मग ते कोणतेही असो ते संपूर्णतः हानिकारकच असते. व्यसनामुळे गंभीर आजार होतातच तसेच व्यसनी व्यक्तींमध्ये नपुंसकत्व येण्याची अधिक शक्यता असते आणि हळूहळू विवेक नष्ट होत जातो, हे जास्त गंभीर आहे . व्यक्तीचा विवेक कमकुवत झाला कि ती व्यक्ती अंधश्रद्धा आणि अनिष्ट गोष्टींना लवकर बळी पडते. शिवाय व्यसनी व्यक्तीच्या हातून चोरी आणि महिलांवरील अत्याचार यामध्येही वाढ होते.व्यसनांच्या दुष्परिणामांबद्दलचे अज्ञान, व्यसनी पदार्थांची सहज उपलब्धता आणि व्यसनाला समाजात मिळणारी प्रतिष्ठा यामुळे नवीन पिढीमध्ये व्यसन लागण्याचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येते. कोणत्याही सण,समारंभ उत्सवांमध्ये दारू पिणे हे आता प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. नवीन पिढीला ही संधी मिळते. परंतु वेळीच जर व्यसन व त्याचे दुष्परिणाम याबद्दलचे प्रबोधन झाले तर काही प्रमाणात का होईना व्यसनांना आळा बसू शकतो,असे यावेळी कार्यकर्त्यांकडुन सांगण्यात आले.यावेळी डॉ.टी.आर.गोराणे, प्रा डॉ सुदेश घोडेराव, कृष्णा चांदगुडे, राजेंद्र फेगडे, प्रल्हाद मिस्री, प्रा.आशा लांडगे, कोमल वर्दे, महेंद्र दातरांगे, विलास सोनावणे, प्रथमेश वर्दे, स्वाती तेलगोटे, सुशील ईंदवे यांनी सहभाग घेतला.
