
श्री.तुकारामजी ढिकले लिखित “मी खोदतोय लेणी” हा त्यांचा काव्यसंग्रह त्यांनी मला स्नेहभेट म्हणून दिला.कोऱ्याकरकरीत सुंदर बांधणीच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ पुस्तकाच्या नावानुसारचं तंतोतंत होतं.एका हातात छिन्नी अन् एका हातात हातोडा घेऊन आवेशपूर्ण,जोशात पिळदार शरीयाष्ठीचा तो माणूस लेणी खोदतोय् असं मुखपृष्ठ बघताना आपल्या मनामध्येही जिद्द जोश,निर्माण करण्याची ताकद या मुखपृष्ठात आहे असा विचार मनात आला आणि तेव्हाच विश्वास वाटू लागला की या पुस्तकातल्या कविता जबरदस्तच असणार.वाचण्याच्या उत्सुकतेबरोबरचं पुस्तकाच्या नावाभोवतीही मन पिंगा घालू लागलं.नेमका काय अर्थ असेलया संग्रहाच्या नावाचा ! विचारचक्र सुरू झालं. हात आणि लेखणी म्हणजेच छिन्नी हातोडा.याच छिन्नी हातोड्याने लेण्यांची नवनिर्मिती की या सुंदर लेण्यांच्या आत,समाजमनाचे विविध कंगोरे,पैलू अन् मुखवटेधारीही असावेत. याचा शोध घेण्यासाठी तर लेण्याचं खोदकाम करत असावेत बहुधा.उलटसुलट विचारांच्या गर्तेत बराच वेळ निघून गेल्यानंतर लक्षात आलं की याचं उत्तर तर या कवितांमध्येच असणार ! मुखपृष्ठ आणि संग्रहाचे नाव ..दोन्ही गोष्टी कवितांशी बांधिल असणार आणि त्याच विचारात संपूर्ण काव्यसंग्रह वाचून काढल्या नंतर मला पडलेल्या प्रश्नाची उकल झाली.आणि मुखपृष्ठाच्या चित्रावरून लावलेला जबरदस्त कविता असाव्यात हा अंदाजही खरा ठरला.कवीची वज्रमुठ किती ताकदवर आहे त्याचा प्रत्यय त्यांच्या या कवितेच्या दोन ओळीतूनच येतो.*मातीच जन्मभूमी,मातीच कर्मभूमी**ही वज्रमूठ माझी,पाषाण फोडतो मी* या काव्यसंग्रहात एकूण ७८ कविता आहेत.या कविता वाचताना लक्षात येतं की या कविता उथळ नाहीत.अर्थगर्भीत या कवितांना चिंतनात्मक वैचारीक बैठक आहे.समाजात घडणाऱ्या दुष: प्रवृत्तीच्या घडामोडी,जनहितावर होणारे त्यांचे आनिष्ट परिणाम,ओल्यासुक्या दुष्काळाने आणि सावकारी तगाद्यानेपिचलेला शेतकरी,त्यातूनच होणाऱ्या आत्महत्या, भ्रष्टाचार,सत्ताधिशाची मुजोरी,विफलता अशा एक ना दोन अनेक गोष्टींचा सर्वकष विचार त्यांच्या कवितेतून आपल्या निदर्शनास येतो.कोरोना काळात मृत्युचं तांडव आणि भयग्रस्त जीवन, ध्वस्त झालेले संसार आणि हे सर्व डोळ्यासमोर घडत असतांनाही क्षणभंगूर जीवनाची जाणिव न होणाऱ्यांसाठी,.. आता तरी शहाणे व्हा..म्हणजेच आत्मचिंतन करा,सगळं इथेच सोडून जावं लागणार आहे. वरवर हा संदेश सौम्य जरी वाटत असला तरीही जगण्याला भान देणारा आहे. या संग्रहातील प्रत्येक कविता वेगळी असली तरीही प्रत्येक कवितेत एक वैचारिक विचारांची धगधगती धग आहे.कवीची अंतस्थ घुसमटलेली,अस्वस्थ मनाची उलघाल मोकळी होऊ पाहतेय्.या संग्रहातल्या,आसूड,चेहरे,काळ भयंकर, मृगजळ केवळ,रे थांबवा तमाशा,कोठे कधी,धग,तुटलाय् अन्नदाता,भांडतात आता,काळ भयंकर मी खोदतोय लेणी या आणि इतर कवितांमधेही दिसून येते.या कविता वाचताना कवीला अन्यायाची प्रखर चीड आहे,तरीही भाववृत्ती, संयमित, संतुलित आहे.मन भावनाप्रधान आणि संवेदनशील आहे.कुठेही आक्रस्ताळेपणा नाही किंवा ओरखाडेही नाहीत.जडजंबाल शब्दप्रयोग नाहीत,किंवा उपमा,अलंकाराचा भडिमार नाही.पण शब्दांना धार मात्र आहे.अन्यायावर,भ्रष्टतेवर आसूडाचे फटके तर बसावेत पण आसूड दिसूच नये.अशा प्रकारे ह्या सामाजाभिमुख कविता आहेत.या कविता भयग्रस्त मनाला हिंमत देणाऱ्या आहेत.भ्रष्ट अन्यायाची जाणीव करून देणाऱ्या आहेत.समाजव्यवस्था स्वस्थ,आणि सुखात राहण्याची तळमळ त्यांच्या एकंदरीत कवितेतून स्पष्टपणे जाणवते. तुकारम ढिकलेंची चौफेर सजग नजर सगळे बारकावे टिपत त्याला काव्यात्मक शब्दरूपात समाजाचे आपणही देणे लागतो.आपण जर एकत्र येऊन अन्याय ,भ्रष्टताविरोधी लढा दिला तर ही एकीची वज्रमूठ समाजपरिवर्तन निश्चितचं करू शकेल,हा आशावादही काही कवितांमधून जाणवतो.दगडावर वज्रमुठीने प्रहार करत ह्या खोदलेल्या लेण्यांना अवश्य काव्यसंग्रहातून भेट द्या.*”मी लेणी खोदतोय्…* सहजसुलभ भाषाशैलीतल्या या कविता,मनाला भिडणाऱ्या आणि विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत.वजनदार,दमदार, आशयसंपन्न असा हा काव्यसंग्रह आपल्या संग्रही ठेवण्या योग्य नक्कीच आहे. तुकारामदादा पुढील साहित्यिक वाटचालीसाठी माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.
सौ.सुशिला संकलेचा.**नाशिक.**मोबाईल नंबर- ९४२०७००१४२*
