
मुंबई : (प्रतिनिधी ) कुर्ला येथील गांधी बाल मंदिर विद्यालयात वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, आत्मविश्वासाला आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळवून देणारा हा सोहळा पालक, शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीने संस्मरणीय ठरला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जॉय फाउंडेशनचे संस्थापक गणेश हिरवे, वृत्त प्रकाश चे संपादक मनीष वाघ, आम्ही मुंबईकर चे संपादक प्रमोद सूर्यवंशी, युवा फाउंडेशनचे निखिल भोसले, निकिता मोरजकर उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ, पर्यवेक्षक रवींद्र खोंडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मेहेंदी स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन स्पर्धा, जाहिरात बनवणे स्पर्धा, ग्रीटिंग कार्ड अशा विविध शैक्षणिक व सर्जनशील स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पारितोषिक स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान स्पष्टपणे दिसून येत होता.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. रंगीबेरंगी वेशभूषा, तालबद्ध हालचाली आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह उत्साहाने भरून गेले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक अनिल पांचाळ यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. अभ्यासासोबतच कला, क्रीडा आणि विज्ञान यांना समान महत्त्व देण्यावर त्यांनी भर दिला.
प्रमुख पाहुणे गणेश हिरवे यांनी आपल्या मनोगतात, “आज या शाळेत येऊन खूप छान वाटत आहे. रोजच्या अभ्यासाच्या गडबडीतून थोडा वेळ बाजूला काढून मुलांनी आज आपली कला, आत्मविश्वास आणि मेहनत आपल्यासमोर मांडली, याचा खूप आनंद आहे. नृत्य असो, गाणी असोत—प्रत्येक सादरीकरणामागे मुलांचा सराव, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे पाठबळ दिसून येते. म्हणूनच अभ्यासाबरोबरच अशा उपक्रमांना तेवढेच महत्त्व आहे,” असे मत व्यक्त केले.
पत्रकार प्रमोद सूर्यवंशी यांनी ‘वाचाल तर वाचाल’ ही स्वतःची कविता सादर करत विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. पुस्तकांशी मैत्री केल्यास ज्ञानाबरोबरच विचारशक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकसित होते, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम जोशी, प्रणिता रुईकर आणि मंगला गरुड यांनी प्रभावीपणे केले. बक्षीस संकलन आणि वाटप अर्चना जाधव, अर्चना सातपुते या शिक्षकांनी केले. कार्यक्रम प्रमुख विजया सालावकर आणि दत्ता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शिक्षकवर्गाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या गजरात आणि पालकांच्या समाधानाने हा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारितोषिक वितरण सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे एन सी सी प्रमुख व शिक्षक विश्वनाथ पांचाळ यांनी विशेष मेहनत घेतली.
