
ओझर: दि.२२ वार्ताहर
येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिना निमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक शिक्षिका संगिता शेटे यांनी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे ज्येष्ठ गणित शिक्षक आत्माराम शिंदे ,सोनल माळोदे,राजश्री मोहन,किर्ती बच्छाव, ज्योती पाटील, बाबासाहेब गायकवाड,मंगल सावंत, सरोज खालकर, संगीता शेटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गणितीय मॉडेल्स, पोस्टर्स, रांगोळी, शब्दकोडे, प्रश्नावली, सूत्रे आदींचे सादरीकरण केले.

तसेच श्रीनिवास रामानुजन यांचे कार्य यावर भाषणे केली. संगीत शिक्षिका व गीतमंच यांनी गणित गीतांचे सादरीकरण केले. गणित शिक्षिका मंगल सावंत यांनी दैनंदिन जीवनात गणिताचे स्थान यांवर आपले विचार मांडले. कु. काव्या काळे या विद्यार्थीनीने तयार केलेले भीत्तीपत्राचे अनावरण मुख्याध्यापकांच्या हस्ते झाले. उपक्रमात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी, श्रीनिवास रामानुजन यांचे गणित अतिशय संवेदनशील ग्रहणशील व तरल चित्तवृत्ती मुळेच सूत्रांचा अभ्यास करून रोखठोक तर्कशास्त्र आणि निर्विकार गणिती चौकटीत शिक्षण व गणितातील मूलभूत तसेच उपयोजन संशोधन यासाठी रामानुजन यांचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवला पाहिजे त्यांनी आर्थिक शैक्षणिक आणि शारीरिक प्रतिकूल परिस्थितीतही गणितासाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून देत भारताची गणितातील गौरवशाली परंपरा वाढवली व अंकशास्त्र थिटा फंक्शन आणि अनंत मालिका या क्षेत्रात त्यांनी मोलाचे काम केल्याचे विद्यार्थ्यांना स्पष्ट केले. फलक रेखाटन कलाशिक्षिका सविता पवार यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका संगीता शेटे यांनी केले. आभार शिक्षिका सरोज खालकर यांनी मानले.
