
नाशिक जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ पाटिल गायकर यांजकडुन-
ईगतपुरी हे मुंबई राजधानीचे प्रवेशद्वार. थंड हवेचे ठिकाण व भाताचे आगार आणि पावसाचे माहेरघर म्हणुन हा तालुका ओळखला जातो.या शहरात नगरपालिका निवडणुकीत सलग सातव्यांदा येथला मतदार हा भगव्याबरोबर कायम राहिला आहे.शिलेदार बदलले असले तरी शिवसेनेची सत्ता येथे कायम राहिली आहे.तर जे संजय इंदुलकर तीस वर्ष या ठिकाणी एकहाती वर्चस्व राखुन होते,त्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला,पण मतदारानीं भाजपला साफ नाकारले आहे. याच बरोबर तीस वर्षाची इंदुलकराचीं सत्ता ही संपुष्टात आणली आहे.राष्ट्रवादी कॉग्रेंस पक्ष येथे किंगमेकर ठरला असुन शिवसेनेसोबत युती करत प्रथमच हा पक्ष येथे सत्तेत आला आहे. आमदार हिरामण खोसकर यांनी ही लढाई प्रतिष्ठेची केली होती व ती जिंकली पण आहे.यामुळे आगामी जि.प.व पं.स. निवडणुकीसाठी ही त्यांचे हौसले बुलंद झाले आहे.
सलग तीस वर्ष संजय इंदुलकर नावाचा शिवसैनिक नेता या शहरावर एकहाती वर्चस्व राखुन होता.हिंदु,मुस्लिम व दलित अशी संमिश्र वस्ती असणारे हे शहर नेहमीच शांतिप्रिय शहर राहिले आहे याचे श्रेय इंदुलकराचेंच.पण असे असले तरी मुलभुत विकासाच्या नावाने मात्र येथे आनंदीआनंद होता.येथला कारभार इंदुलकर हे मुंबई बसुन चालवत आहेत असेही आरोप होत होते.पण तरीही इंदुलकर विजयी होत होते यामागचे एकमेव सबळ कारण हिंदुत्व हेच होते.हिंदुत्व विरोधी शक्ती येथे डोके वर काढु नये या एकाच मुद्दयावर इथला मतदार हा मतदान करत असे.
यंदा प्रथमच येथुन इंदुलकर हद्दपार झाले याचे पहिले कारण म्हंणजे त्यांनी भाजप सोबत जाणे पसंत केले.खरेतर शिवसेना फुटीनंतर ते गेली साडेतीन वर्ष उ.बा.ठा गटातच होते.पण उबाठा चे कुंकु लावुन निवडणुक लढवली तर पराभव निश्चित होईल याची जाणिव झाल्याने ते भाजपसोबत गेले.पण त्यांचे बरेचसे समर्थक सतिश कर्पे , उमेश कस्तुरे व ईगतपुरी मुळ गाव गावठावर वर्चस्व असणारे खातळे हे शिवसेना शिंदे गटात गेल्याने हिंदुत्ववादी नेते व समर्थकामध्येच येथे उभी फुट पडली.खरेतर येथे भाजप व शिवसेना या दोघानीं एकत्र येणे गरजेचे होते.पण इंदुलकरानां मी जिथे, तिथे विजय हा बहुधा गर्व झाला असावा.पण हिंदुत्ववादी मपद्दयावर कायमच मतदान करणार्या मतदारानां यंदा प्रथमच शिवसेना शिंदे गटाचे रुपाने इंदुलकरानां पर्याय सापडला आणि जनतेने इंदुलकरानां धडा शिकवला.
इंदुलकरानीं एकला चलो रे ची भुमिका घेतली हीच चुक त्यांना भोवली.
तुलनेत शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते संजय खातळे यांनी सर्व समावेशी बेरजेचे राजकारण केले.त्यांनी ऐनवेळी इंदुलकर विरोधकानां आपल्या सोबत आणले.येथे राष्ट्रवादी काँग्रेस ने अतिशय चतुराईने खेळ केला. चेहरा हिंदुत्ववादी शिवसेना शिंदे गटाचा पुढे केला.पण त्याच बरोबर कॉग्रेंस, राष्ट्रवादी काँग्रेस चा पारंपारीक मतदार आपल्या पाठीमागे खेचला.प्रथमच हिंदुत्व विचारसरणीचा मतदार व विरोधी मतदार हे दोघेही सोबतीने आले आणि येथे चमत्कार घडला.
आमदार हिरामण खोसकर यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती.आणि प्रथमच या शहरात कुणी आमदार प्रभावी ठरावा असा निकाल आला आहे. या बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस गोरख बोडके, माजी जि.प. सदस्य अँड. संदिप गुळवे या दिग्गजानींही येथे ताकत झोकली आणि चमत्कारास हातभार लावला.
भाजपने मात्र या निवडणुकीत नेतृत्व आयात करुन हसु करुन घेतले.भाजपच्या अनेक कट्टर नेत्याचां व कार्यकर्त्याचां येथे
पराभव झाला.
कॉग्रेंस, रा.कॉ.श.प.गट व उबाठा हे येथे अस्तित्वहीन, प्रभावहीन व नेतृत्वहिन असल्याने लढतीत त्यांचा मागमुस ही नव्हता.
प्रथमच ईगतपुरी शहर इंदुलकर मुक्त झाले आहे.आता नव्या नेतृत्वाकडुन ईगतपुरी शहर वासीयानां मोठया अपेक्षा आहेत. ईगतपुरी शहर हे मुंबई नजीक असुन मुंबई कराचें दुसरे घर आहे.कोरोनाकाळात ठाकरे सरकार मुंबई राजधानीचा कारभार या शहर व शहरानजीक हलवण्याच्या तयारीत होते.मात्र तत्पुर्वीच हे सरकार पडले तरी या निमित्ताने ईगतपुरी शहराचे महत्त्व अधोरेखित होते.
आगामी कालखंडात या शहराचा चेहरा मोहरा बदलावा हीच अपेक्षा आहे.
