
लोहोणेर येथील जनता विद्यालयात अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त रांगोळी रेखाटनातून विविधतेतून एकतेचा संदेश देताना विद्यार्थिनीं समवेत पर्यवेक्षक व्ही.एम. निकम व शिक्षकवृंद. (छाया-:सुनिल एखंडे)
लोहोणेर- (प्रतिनिधी): येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी रांगोळी रेखाटनाच्या माध्यमातून विविधतेतून एकता हा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवला. अल्पसंख्याक घटकांबाबत आत्मीयता, समता, बंधुत्व व परस्पर सन्मानाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, तसेच भारतीय संविधानाने दिलेले समान हक्क व संरक्षण याची जाणीव व्हावी, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यामागील भूमिका स्पष्ट करत शिक्षणाचा हक्क,धर्मस्वातंत्र्य, भाषा व संस्कृती जपण्याचे अधिकार यांचे महत्त्व अधोरेखित केले.यानंतर विद्यार्थिनी वैष्णवी भामरे व कोमल सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून अल्पसंख्याक हक्क दिनाचा इतिहास, त्याचे आंतरराष्ट्रीय महत्त्व तसेच विविध धर्म,भाषा व संस्कृती यांचे सौंदर्य जपण्यात तरुण पिढीची भूमिका विशद केली. विविधतेतूनच भारताची ओळख निर्माण होते आणि एकोपा व सहिष्णुतेतूनच समाज प्रगती करतो, असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले पर्यवेक्षक व्ही.एम. निकम यांनी अध्यक्षीय मनोगतात भारतीय संविधानातील अल्पसंख्याकांना दिलेल्या हक्कांची सविस्तर माहिती देत सर्व घटकांना समान संधी व सुरक्षितता मिळणे हे लोकशाहीचे बलस्थान असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी मानवतावाद, सद्भावना व राष्ट्रीय एकात्मता जपावी,असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रम मुख्याध्यापिका के.ए.शिंदे व उपमुख्याध्यापक एन.आर.ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक ए. टी. शेवाळे, सी. ए. वाघ, आर. जे. थोरात, यु. पी. चव्हाण, ए. व्ही. सूर्यवंशी, ए. एम. पाटील आदी उपस्थित होते. या दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी निबंध व चित्रकला स्पर्धांमधून अल्पसंख्याक हक्कांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. तसेच अनुष्का दशपुते, खुशी बोरसे, श्वेता शेवाळे, गुंजन शेवाळे, सई सोनवणे, अनुष्का सूर्यवंशी, नंदिनी बागुल,वैष्णवी देशमुख आदी विद्यार्थिनींनी आकर्षक रांगोळी रेखाटनातून सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी केले.
