नाशिकरोड:(प्रतिनिधी)- आयुष्याची वाटचाल करत असताना संकटे आणि अडचणी येत असतात. मात्र त्यांना संधी मानून सतत प्रयत्न केल्याने यश निश्चित मिळते. असा यशस्वी माणूस होण्यासाठी उत्तम संस्कारांची खऱ्या अर्थाने गरज असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समुपदेशक डॉ.चिदानंद फाळके यांनी केले.
पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात डॉ.फाळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. मंचावर ज्येष्ठ साहित्यिक प्रा.हेमंत चोपडे, मुख्याध्यापक अरुण पगार उपस्थित होते.
डॉ.फाळके यांनी वाढदिवसानिमित्त 'दातृत्वाचा ज्ञानयज्ञ' उपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याला संस्कारक्षम ग्रंथभेट आणि विद्यालयाला २० लेझिम भेट दिल्या. यावेळी फळांचा केक कापण्यात आला. प्रा.चोपडे यांनीही डॉ.फाळके यांनी वाढदिवशी असा अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल कौतुक केले. मुख्याध्यापक अरुण पगार यांनी सन्मानचिन्ह देत पाहुण्यांचे स्वागत केले. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.