
इंजिनिअर कृष्णा पवार*
संस्थेचा विकास होत असताना जसा संस्थेचा विकास होतो, तसतशी ती संस्था व्यक्तिनिष्ठ न राहता तत्त्वनिष्ठ झाली पाहिजे—हा विचार केवळ शब्दांत न राहता आयुष्यभर कृतीतून जगणारे नेतृत्व म्हणजे अँड. विठ्ठलराव गणपतराव हांडे.
चाटोरी (ता. निफाड, जि. नाशिक) येथील साध्या कुटुंबात जन्मलेल्या हांडेसाहेबांनी बालपणापासूनच शिक्षण, शिस्त आणि सामाजिक जाणिवेचा पाया मजबूत केला. मराठा हायस्कूल, उच्चशिक्षण महाविद्यालय, कोथरूड (पुणे) येथून शिक्षण पूर्ण करून त्यांनी बी.ए., एल.एल.बी. ही पदवी प्राप्त केली. वकिली हा व्यवसाय स्वीकारताना त्यांनी तो केवळ उपजीविकेचा मार्ग न मानता समाजन्यायासाठीचे साधन बनवले.
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि मानवतावादी विचारधारेचा त्यांच्या जीवनावर खोल प्रभाव होता. त्यामुळेच शेतकरी, कामगार, वंचित घटक यांच्या हक्कांसाठी ते सातत्याने उभे राहिले.
१९४८ साली स्थापन झालेल्या शेतकरी-कामगार पक्षाशी ते आयुष्यभर प्रामाणिक राहिले—विचारांशी निष्ठा ठेवणारी ही वृत्तीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ठरली.
मविप्र संस्थेतील त्यांचे अमूल्य योगदान न विसरता येण्यासारखे आहे.
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या (मविप्र) वाटचालीत अँड. हांडे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी विविध कालखंडात अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली (1९६७–७३) चिटणीस (१९७३–७७, १९७९) सभापती ८१–८४, १९९७–२००२). सभापती संस्थेतील निर्णयप्रक्रियेत तत्त्वनिष्ठता, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकी हे मूल्य त्यांनी रुजवले.
आज त्यांच्या स्मरणार्थ सुरू असलेल्या अँड. विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नाशिक आणि कर्म. विठ्ठलराव हांडे जनता विद्यालय, चाटोरी या शैक्षणिक शाखा त्यांच्या दूरदृष्टीचे सजीव प्रतीक आहेत.
लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे कार्य अजअमर आहे
१९५७ ते १९६२ या काळात ते शेतकरी-कामगार पक्षातून आमदार होते. १९६८–७४ या काळात विधानपरिषद सदस्य म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले. विरोधी पक्षनेते म्हणून महाराष्ट्र विधानपरिषदेत त्यांनी सुमारे दोन दशके लोकशाही मूल्यांची, शेतकरी-कामगारांच्या प्रश्नांची ठाम बाजू मांडली. लोकप्रतिनिधी म्हणून सत्ता नव्हे, तर लोकहित हेच त्यांचे ध्येय होते.
“प्रेरणा देणारी, आधार देणारी मुख्य व्यक्ती नसेल तर संस्थेत अंधार पसरतो”—हा इशारा देणारा त्यांचा विचार आजही तितकाच समर्पक आहे. व्यक्तिनिष्ठतेऐवजी तत्त्वनिष्ठतेचा आग्रह धरणारे हांडेसाहेब हे मूल्याधिष्ठित सार्वजनिक जीवनाचे आदर्श उदाहरण होते.
१६ डिसेंबर २००९ रोजी (मुंबई) त्यांचे निधन झाले; परंतु त्यांनी रुजवलेली मूल्ये, उभी केलेली शैक्षणिक परंपरा आणि लोकशाहीवरची निष्ठा आजही मार्गदर्शक ठरते.
विनम्र अभिवादन व श्रद्धांजली
समाजकारण, शिक्षण आणि लोकशाही मूल्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या
अँड. विठ्ठलराव गणपतराव हांडे यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त
भावपूर्ण अभिवादन व विनम्र श्रद्धांजली.
—* इंजिनिअर कृष्णा पवार*
