
नाशिक (प्रतिनिधी)शिक्षणाबरोबरच आपण आपल्यातील कलागुण ओळखून त्याचा विकास केला पाहिजे. त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी असली पाहिजे. जीवनात अनंत अडचणी येतात. त्या अडचणींवर मात करून जो पुढे जातो तोच जीवनात यशस्वी होती. आजच्या डिजिटल युगात आपण मोबाईलच्या नादाला लागून आपले नुकसान करतो आहोत. म्हणून प्रत्यक्ष मैदानी खेळ हे तुमच्या शरीराला आणि मनाला बळकटी देतात. खेळातून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास घडून येतो. असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले.
के. के. वाघ शिक्षण संस्था, के. के. वाघ फाउंडेशन, बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाउंडेशन व स्माईल स्पिनॅच सेंटर ऑफ एक्सलंस यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन, के. के. वाघ कॅम्पस काकासाहेबनगर येथील भव्य मैदानावर त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ होते. त्यांनी विद्यार्थी खेळाडूना मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खरे गुण दडलेले असतात मात्र त्यांना आपल्यातील कौशल्य दाखविण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळत नाही. त्यांच्यातल्या कलागुणांना स्थान मिळावे, याच उद्देशाने कर्मवीर काकासाहेब वाघ क्रीडा चषकाची निर्मिती केली.
स्पर्धा संयोजक एस. पी. क्षीरसागर यांनी क्रीडा चषकाच्या स्पर्धेचा गेल्या तेरा वर्षांचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शरद कदम यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अरुण ठोके यांनी केले. आभार वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अतुल गवारे यांनी मानले
कार्यक्रमासाठी रामनाथ पानगव्हाणे, विलास वाघ, बाळासाहेब वाघ, तेजेंद्र वाघ, रामभाऊ पाटील, रघुनाथ कोल्हे, कचुनाना शिंदे, संदीप वाढवणे, पी. आर. जाधव, भाऊसाहेब शिंदे, अशोक आहेर, संदीप साबळे, राहुल वाघ, सोपान वाघ, वैभव कुशार, प्रवीण वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
के. के. वाघ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय आणि इंग्लिश मिडीयच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.
