
विधानपरिषदेत लक्षवेधीद्वारे मांडतांना आमदार किशोर दराडे
नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षणाधिकारी तसेच पुणे येथे कार्यरत असताना बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपांवरून शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आज विधानपरिषदेत लक्षवेधीद्वारे मांडण्यात आली.

शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष संजय चव्हाण
तक्रारदार म्हणून शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष संजय चव्हाण यांनी गंभीर आरोप नोंदवले आहेत. आदिवासी बहुल भागात एकस्तर वेतनश्रेणी, तसेच विविध शाळांना टप्पा अनुदान देण्याच्या प्रक्रियेत शिक्षकांकडून आर्थिक पिळवणूक करून प्रवीण अहिरे यांनी करोडोंची माया जमविल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत शासनाकडे अधिकृत तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
विधानपरिषदेत नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी ही लक्षवेधी सादर केली. तक्रारीची दखल घेत शासनाला चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे आमदार दराडे यांनी सभागृहात स्पष्ट केले.
या प्रकरणामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून आगामी काळात शासनाची कारवाई व चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
