
आदीम काळापासून स्त्री चोहोबाजूंनी बंदिस्त जीवनात ती आपला मोकळा श्वासही घेऊ शकत नव्हती. तिची सतत खाली मान घालून वावरणे जणू ती तळघरातील रहिवाशी, पुरुषप्रधान समाजात तिला मान्यता नव्हती पुरुषांच्या दृष्टीने पुरुष नर स्त्री मादी या पलीकडे स्त्रीला महत्व नव्हते.सोशिकपणांच्या वेष्टणांने लपेटलेली स्त्रीअबोल राहिली.
कालांतराने स्त्री शिक्षणाने ती स्वतःचे आयुष्य विकसित करू लागली .ती स्वतःलाच प्रश्न विचारू लागली डोळसपणे विश्व पाहू लागली सुख- दुःख यातना वेदना, घुसमट, शोषण ,संघर्ष, अन्याय, संताप ,चीड यांची ती अंतर्मुख होऊन मंथन करु लागली. बोलू लागली लिहू लागली.
कविता वीज आहे, असे कवी केशवसुत यांनी म्हणून ठेवले आहे आणि ती धरली तर भल्याभल्यांना भाजून काढते. परंतु प्रतिमा संपन्न संवेदनशील कवयित्री प्रतिभा खैरनार यांनी ती वीज आपल्या हृदयात रुजवली आणि लाव्हारसाच्या लेखणीच्या स्वरूपात कविता शब्दबद्ध करून “वंशावळीच्या प्राचीन सरीतून “या आशयघन काव्यसंग्रह साहित्य दरबारात दाखल केला.या काव्यसंग्रहात रंजकता व कल्पनाविलास यांचा दुरान्वये संबंध नाही.फक्त वास्तवाचा विस्तव आहे.
कवयित्री प्रतिभा खैरनार यांनी स्त्री जीवन अत्यंत जवळून पाहिले आहे स्त्रीपणाची झूल उतरून एक जळजळीत सत्य परंतु कोठेही आक्रोश आकांत तांडव विद्रोह न आणता नग्नतेचा निखारा काळजावर ठेवण्याचे धाडस प्रतिभाने केले आहे आणि वाचकांना भाजून काढले आहे. हे त्यांच्या काव्यसंग्रहाचे यश आहे. स्त्रीच्या बाह्य रुपापेक्षा तिच्या अंतरंगातील धग, घुसमट, स्त्रीत्वाचा शोध घेते. अत्यंत प्रतिमात्मक शब्दयोजना करून कवयित्रीने प्रत्येक कवितेला उंची दिलेली आहे.
“माझ्या जन्माच्या वेळी” या कवितेत कवयित्री म्हणते.”नांगरून काढलं खळं
पायाच्या टाचांनी
भळवळणारी योनी आ वासून
घालू पाहत होती पोटात
अख्खी सृष्टी.
पुढे त्या म्हणतात,
आणि पुन्हा एकदा आली जलमाला
सोशीकतेचा वसा चालवणारी
एक असहाय मादी
नरांच्या पिढ्या
जलमाला घालण्यासाठी”
कवयित्रीने स्त्री म्हणून शल्य भोगलेले आहे पाहिलेले आहे म्हणूनच ती त्रयस्थपणे खंबीरपणे धाडसाने लेखणी चालवते. स्त्री अपत्य जन्माला आल्यानंतर काय पुढे भयावह घडणार आहे हे कवयित्री जाणून आहे. म्हणून तिला मातृत्वाचा आनंदही घेता येत नाही.
“निवडुंगाची मिठी”एक वास्तववादी अल्पाक्षरी कविता वाचकांचे लक्ष वेधून घेते.
“निवडूंगाने गच्च
मिठी मारावी
तशी तुझी आठवण
मला बिलगते
अन्
माझ्या कित्येक रात्री
रक्तबंबाळ होतात”
स्त्री समर्पणाची “मी मला भेटले नाही “ही कविता स्त्री जीवनाविषयी हळूवारपणे खूप काही सांगून जाते.
तुला आठवतं तू
मला भेटलास
आणि त्यानंतर
मी मला कधीच भेटले नाही”
आपल्या आवडत्या माणसावर जीव लावल्यानंतर आणि त्यांनी केलेल्या विश्वासाचा कडेलोटानंतर अशी उद्विग्न कविता निर्माण होते . स्त्री स्वतःचे शील जपताना तिला जीव तोडून संघर्ष करावा लागतो. वासनांध पुरुषाच्या ताकतीपुढे ती हतबल होते तिच्या मनोवस्थेच्या चिंधड्या चिंधड्या होतात. “पदर” या अल्पाक्षरी कवितेत एका कादंबरीचा विषय दडलेला आहे येथे कवयित्रीची प्रतिमा उठून दिसते .वाचकांच्या काळजाला हृदयद्रावक बाण आरपार करतात.” पदर “ही कविता वाचकांसमोर चित्रमय उभी राहते
तिचा पदर फाटला नाही
कधी विहिरीच्या दगडात
जात्यात, फाट्यात,
डोक्यावरच्या ओझ्यात अडकून
पण
सावकारनं दिलेले दान
पदरात घेताना
मात्र टर्रकन फाटायचा
तिचा पदर दरवेळी.
समस्त पुरुष वर्गांची वखवखली नजर तीला असह्य करते. तिला स्त्री जन्मच नकोसा वाटतो अशावेळी कवयित्रीची लेखणी आपोआप कागदावर उतरते “कलंक” या कवितेत ते अधिक स्पष्ट जाणते.
जन्मत:च नाळ खुडून
पुसता यायला हवा होता
बाईपणाचा कलंक बाईला
बाईला आई होण्याआधी
किंवा बाईपणाला जन्माला घालण्याआधी.
पिढीदरपिढी चालत आली बाईपणाचा भोगवटा ही खंत कवयित्रीला अस्वस्थ करते. वाचकाच्या मनात कविता गुंजत राहाव्यात अशा कविता या काव्यसंग्रहात ठायी ठायी वाचकां समोर येतील.
आजूबाजूची भयावह परिस्थिती पाहून कवयित्रीच्या आतील आई धास्तावलेले आहे. स्वतःच्या मुली बद्दलच नव्हे तर समस्त मुलीबद्दल कवयित्रीला चिंता भेडसावते
“कागदी फुल व तडफड “या दोन्ही कविता वाचकांना चटका लावतात
सिग्नलवर कागदी फुलं विकणारी
एक चिमुरडी एका रात्री अचानक
बेपत्ता झाली पुन्हा कधीच पत्ता
लागला नाही तिचा
कुठल्याच रजिस्टर नव्हती
ती हरवल्याची नोंद
किंवा कुठल्याच कोर्टाभरला गेला नाही खटला
तिच्या काळोखातील किंकाळ्यांचा
—–
जरा कुठे तिला वेळ झाला की
सैरभर होतो जीव
तेव्हा कळतं
कावळा घरट्या घालत
असताना झाडावरच्या घरट्यातील
चिमण्यांची तडफड…
कवयित्रीकडे अल्पाक्षरीत व्यापक आशय टिपण्याची कसब आहे. म्हणूनच कवयित्री समस्त स्त्री व बाईपणाची सल अस्सल करण्याची प्रतिमा
उजागर करते.
पुरुष स्त्रीकडे वासनेची लाळ गाळतच प्रत्येक स्त्रीकडे पाहतो. तो फक्त स्त्री भोगता असतो. स्त्रीच्या प्रेम उत्कटभावना तिचं मन याच्याशी त्याला काही घेणे देणे नसते अशाच आशयाची आशयगर्भित “तहान”कविता कवयित्री आपणासमोर ठेवते
पुरुषी वासनेचा
अख्खा समुद्र गिळंकृत करूनही
ती तहानलेली असते
थेंब भर प्रेमासाठी आयुष्यभर.
भावनहीन निर्जीव देहाशी केलेला शृंगार याचं प्रतिक ही कविता व्यक्त करते
एक संदेश वाहक “आत्महत्या” ही कविता वाचकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालते.
बाई पेटवली जाते होळीसारखी
कधी बाई ढकलली जाते
तुडुंब भरलेल्या विहिरीत
पण बाई लावत नाही
गळ्याला फास अन् बाई करत नाही
कधी आत्महत्या.
चटक आणि चटका लावणाऱ्या ज्वलंत सदुसष्ट कवितेंचा शब्दगुच्छ रसिकवाचकापुढे व साहित्यिक दरबारात दाखल करण्यात आला आहे. या काव्यसंग्रहाची अर्पण पत्रिका वाचकांचे लक्ष वेधून घेते
बाईपणाचा हिरवा गर्भ ठेवणाऱ्या
ओसाड पुरुषी माळरानाला
अन् काळाच्या पाठीवर अख्खा जन्म
सहनशीलतेने सारवून- लिंपून
जगण्याचा पापुद्रा धरून आलेल्या
बाई कुळाला…
मनोगताचा फाफट पसारा न करता पारंपारिक मनोगताला छेद देत दोन ओळीतच कवयित्रीने आपली संवेदनशील प्रतिमेचे दर्शन घडविते.
ओटी पोटावरच्या कोरीव लेण्यांमध्ये
घुमणाऱ्या घरंदाज हुंदक्यांचे अर्त स्वर…
या प्रतिभाशाली काव्यसंग्रहाचे स्वागत साहित्य दरबारात चर्चात्मक दृष्टीने होईल हा माझा विश्वास आहे. स्त्रीच्या जगण्याभोवती फिरणाऱ्या कविता अर्थवाही व प्रभावी,ओघवती, सकस आहेत.
कवितेची शब्दकळा साधी सरळ सोप्याभाषेतील आपल्या बोली भाषेतील आहे. म्हणून त्या कविता आपले प्रतिनिधीत्व करतात.कविता सुन्न करणाऱ्या आहेत म्हणून ती वाचकांना सहज भावते व दीर्घकाळ मनात रेंगाळत राहते. पुन्हा पुन्हा वाचत राहावा असा हा काव्यसंग्रह,कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या मनातील अस्वस्थ द्वंद्व शब्द रूपाने कागदावर उतरल्यावर त्याची भीषणता वाचकांना जाणवते. मी काही कवितेच्या शीर्षकांचा नामोल्लेख करतो. जायबंदी ,पाळी अन् बाई,मेक ओव्हर, विहिरीवर गेलेली बाई, बाईच्या आतील बाई अष्टाक्षरी व मुक्तछंदातील म्हणजे छंदबंध कविता काळीज हेलावून सोडतात आणि वाचकांना नकळत मानसिक जखमही करतात.मुखपृष्ठची गुढता अंतरंगातील उत्कंठा वाढविते.
ज्येष्ठ कवी दुर्गेश सोनार यांची परिघाबाहेरील प्रस्तावना या काव्यसंग्रहाचा आरसा आहे अत्यंत तरल व शोधक नजरेच्या टिपणांची लयता जाणवते.
त्यांच्या प्रस्तावानेने काव्यसंग्रहांला उंची लाभली आहे. प्रकाशक परीश पब्लिकेशन पुणे यांच्या परंपरेला शोभेल असा दर्जेदार काव्यसंग्रह निर्माण केला आहे. मळलेली वाट सोडून नाविन्य मार्गावर हा काव्यसंग्रह आपली नाममुद्रा ठसवते.
कवयित्री एक स्त्री असून सर्व झुगारून सक्षमपणे समाजव्यवस्थेला दाहकपणे खिंड पाडते. समस्त अबोल स्त्री वर्गाला वाणी देणारा हा काव्यसंग्रह आपल्या संग्रही हवा एवढे मात्र खरे, कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या काव्यकृतीला माझ्या शुभेच्छा.
• परिक्षण •
मारुती कटकधोंड
सोलापूर
• वंशावळीच्या प्राचीन सरीतून..
प्रतिभा खैरनार
• परीस प्रकाशन,पुणे
•पृष्ठ संख्या -११२
• मूल्य- १८० रुपये
