
नाशिकमध्ये आज कु. चिन्मयी ज्ञानेश्वर पवार लिखित
“संस्कारदीप – wisdom for little Heroes” मानव मूल्यांची प्रेरणा देणाऱ्या चिरंतन कथांचे हे एक इंग्रजी भाषेतील छोटेखानी व आकर्षक पुस्तकाचे भव्य प्रकाशन उत्साहपूर्ण आणि सांस्कृतिक वातावरणात मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून बालसाहित्यिक राजेंद्र सोमवंशी उपस्थित होते. प्राचीन भारतीय संस्कृतीची नाळ जपणारे, संस्कृत श्लोक–अर्थांची सुसंस्कृत मांडणी आणि आकर्षक चित्रांची सुंदर गुंफण असलेले हे पुस्तक मुलांच्या भावविश्वाला समृद्ध करणारे ठरेल असे प्रतिपादन बालसाहित्यिक राजेंद्र सोमवंशी यांनी केले. तसेच कुटुंबात मूल्याधिष्ठित वातावरण दृढ करणारे म्हणून पुस्तकांची मान्यवरांकडून विशेष दखल घेण्यात आली.
या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून बालसाहित्यिक राजेंद्र सोमवंशी, शायनिंग स्टार अकॅडमीच्या मुख्याध्यापिका गीता व्यास , भोसला मिलिटरी कॉलेजमधील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा डॉ. प्रभा जगताप, संस्कार निकेतनच्या संस्थापक सदस्य व संस्कार निकेतन एक परिपूर्ण शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पल्लवी गारोळे, भोसला मिलिटरी कॉलेजचे डॉ. विष्णू पवार, संस्कार निकेतन एक वैदिक पाठशाळेचे प्रधानाचार्य प्रभाकर (अण्णा) पवार, तसेच निवृत्त आय.जी. (आरपीएफ ) रामभाऊ पवार या मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम विद्यालयाचे उपमुख्याध्यापक उमेश आटवणे यांनी केले.
मान्यवरांनी पुस्तकातील संस्कारमय कथा, जीवनमूल्ये आणि भारतीय संस्कृतीचे महत्व अधोरेखित केले. आधुनिक पिढीपर्यंत संस्कृतीचे तेज सहज, सुंदर आणि प्रेरणादायी पद्धतीने पोहोचवण्यासाठी “संस्कारदीप” हे पुस्तक एक मार्गदर्शक दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास सर्व मान्यवरांनी एकमुखाने व्यक्त केला. बालकांच्या संवेदनशील, नैतिक आणि संतुलित व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा साहित्याची आजच्या काळात विशेष गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या पुस्तकाचे प्रकाशक म्हणून संस्कार निकेतन एक शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र, नाशिक यांनी जबाबदारी घेतली.
प्रकाशन सोहळ्यास मोठ्या संख्येने पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि संस्कृतीप्रेमी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. “संस्कारदीप”मुळे मुलांच्या मनात संस्कारांची बीजे रुजतील आणि घराघरात सकारात्मक, सांस्कृतिक व मूल्याधिष्ठित वातावरण फुलेल, अशी भावना उपस्थितांतून व्यक्त करण्यात आली.
यावेळी अँड.इंद्रभान रायते व पवार परिवाराकडून यांच्या उपस्थित मान्यवरांचा सत्कार आला.
