
नांदगांव (प्रतिनिधी )कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगांव येथे राष्ट्रीय सेवा योजना तसेच राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एन.भवरे यांनी आपल्या मनोगतातून संविधानाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले तसेच संविधान हा देशाचा आत्मा असल्याचे प्रतिपादित करून विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे वाचन करण्याचे आवाहन केले.

संविधान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक सुरेश नारायणे यांचे ‘भारतीय संविधान’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी सदर प्रसंगी भारतीय संविधान स्थापनेची पार्श्वभूमी,निर्मिती, उद्देश राज्यघटनेतील मूलभूत हक्क व संविधानाचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन आपल्या व्याख्यानातून केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन करून प्रतिज्ञा घेण्यात आली. सदर प्रसंगी मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे, डॉ.बी.एम.अहिरे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला व वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा.जी.व्ही.बोरसे, प्रा.पाटील मॅडम, प्रा.महाले, प्रा.गायकवाड उपस्थित होते.

संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी’ प्रा.बी.के पवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.एम.अहिरे यांनी केले. संविधान दिनाच्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

