
नांदगाव(प्रतिनिधी) मुलांच्या विवाहासाठी लागणारे दागिने खरेदी करुन व पोस्टातुन पैसे काढून रस्त्याने पायी जात असतांनाच मागुन पल्सर गाडी येऊन या वृध्द दांपत्याच्या हातातील पिशवी हिसकावुन घेऊन पलुन गेल्याने या वृध्द दांपत्यावर मुलांच्या लग्नाच्या तोंडावर बाका प्रसंग उभा राहिला आहे. नांदगाव पोलीस स्टेशन समोरील हुतात्मा चौकातुन पायी जाणाऱ्या वृध्द दांपत्याच्या हातातुन अज्ञात दुचाकी चोरांनी मौल्यवान वस्तूची पिशवी हातोहात पळविली या घटनेने नांदगाव शहरात एकच खळबळ उडाली. फिर्यादी गोरख त्रंबक चव्हाण पत्नी सोबत नांदगाव येथे बॅंकेतुन व पोस्टातुन पैसे काढण्यासाठी आले होते. पैसे काढल्यावर त्यांनी सराफी बाजारातुन मुलांच्या लग्नासाठी दागिने खरेदी केले. त्यानंतर शहरातील पोस्ट ॴॅफिस ते हुतात्मा चौक दरम्यान पायी जात असताना अज्ञात पल्सर दुचाकीस्वारांनी त्यांच्या हातातील पिशवी झडप घालुन पळवुन नेली. वृध्द दांपत्यानी तात्काळ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पोलीसांनी त्यांना सोबत घेऊन मनमाड गाठले ,नाकाबंदीही केली.परंतु चोरट्यांचा कुठेही शोध लागला नाही. या संदर्भातील फिर्याद नांदगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.एकंदरीत फिर्यादीचे तीन लाख रूपये नुकसान झाले. परंतु पोलिस नोंदी मध्ये दोन लाख अठरा हजार रुपये ऐवज दाखविण्यात आला आहे.दि. २६ मार्च रोजी चव्हाण यांच्या मुलाचे लग्न आहे. त्या लग्नासाठीच काही मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम हाती ठेवली होती. पोलीसांनी तक्रार दाखल करुन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.स्थानिक नागरिकांना सावधगीरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस दप्तरात नोंद झाल्या प्रमाणे एक लाख पन्नास हजार रुपये रोख व तीन तोळे सोने ( त्यामध्ये पाच अंगठ्या प्रत्येकी तीन ग्रॅमच्या) आधार कार्ड, सोने खरेदी पावत्या, बॅंकेचे व पोस्टाचे पासबुक, गॅस भरण्यासाठी लागणारे पुस्तक, कामगार विभागाचे पुस्तक, पोस्टाचे एफडी बुक, पॅनकार्ड, इत्यादी महत्वाचे कागदपत्रे,या पिशवीत होते. ती पिशवीच चोरांनी पळवुन नेल्यामुळे चव्हाण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.


