
महाराष्ट्र अंनिसच्या जोडीदाराची विवेकी निवड या विभागाच्या वतीने शासकीय अध्यापिका विद्यालय ,जिल्हा कोर्टासमोर, नाशिक येथे नुकतीच संवाद शाळा अतिशय उत्साहात संपन्न झाली.

संवाद शाळेच्या पहिल्या सत्रात अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे यांनी जोडीदाराच्या विवेकी निवडीच्या पंचसूत्रीची मांडणी करताना सांगितले की, पतीपत्नीच्या नात्यातील सुरेल संवादासाठी जोडीदाराची विवेकी निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. विवाह हा एका दिवसाचा इव्हेंट नसून ती आयुष्यभराची गुंतवणूक असते. त्यामुळे मुलांमलींसह दोन कुटुंबे जोडली जातात.
म्हणून विवाहापूर्वी प्रेम आणि आकर्षण यातला फरक समजणे अत्यंत आवश्यक आहे .

बऱ्याच वेळा आकर्षणालाच प्रेम समजून आयुष्यातील पुढचे अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यातून दोघांनाही व त्यांच्या कुटुंबांनाही मनःस्ताप करण्याची वेळ येऊ शकते.
म्हणून पुढच्या आयुष्यातील सर्व आवश्यक त्या गरजा, पूर्तता व त्यासाठी लागणारे एकमेकांच्या क्षमता, स्वभाव, सवयी, विचार व आवडीनिवडी यांची पूरकता विचारपूर्वक तपासली पाहिजे.

जोडीदाराच्या निवडीचे दुसऱे सूत्र म्हणजे जोडीदारामध्ये बौद्धिक, भावनिक व मूल्यात्मक अनुरूपता पाहणे आवश्यक आहे. काही उदाहरणे देऊन हा आशय स्पष्ट करण्यात आला. तिसऱ्या सूत्रात ते म्हणाले की
हुंडा, व्यसन आणि पत्रिका, कुंडली या गोष्टींना ठाम नकार देऊनच पुढील बोलणी करावी. त्यासाठी याबाबतची अगोदरच माहिती घेणे आवश्यक आहे.
चौथ्या सूत्राचा आशय स्पष्ट करताना डॉ.गोराणे म्हणाले की अलीकडच्या काळात खोटी प्रतिष्ठा आणि डामडौलापोटी अनाठायी प्रचंड खर्च केला जातो. त्यामुळे अनेक मुलींच्या आई-वडीलांनाआयुष्यभरासाठी कर्जबाजारीपणाला सामोरे जावे लागते. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाची शक्यताही पडताळून पाहावी, असे पाचव्या सूत्रात त्यांनी सांगितले.

सहजीवनातून संसार फुलला तो खरोखर आनंददायी होतो. विवाह करण्यापूर्वी वजन, उंची, आवडीनिवडी, सवयी, स्वभाव, सुदृढता, अनुवंशिक आजार, विचारसरणी, भविष्यातील स्वप्नं आणि दोन्ही बाजू कडची परिपूर्ण माहिती परस्परांना मिळणे आवश्यक आहे, असे डॉ.गोराणे यांनी संवाद साधताना सांगितले.
दुसऱ्या सत्राची मांडणी करताना सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ्ज डॉ. अर्चना खैरनार यांनी विद्यार्थिनींचे दैनंदिन आरोग्य, आहार , लसीकरण, वेळोवेळी आरोग्याची तपासणी आणि आजारावर इलाज कुठे कुठे उपलब्ध असतात याबद्दलची अतिशय उपयुक्त माहिती दिली. विद्यार्थिनींच्या आरोग्यबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी संवादातून अतिशय समर्पक पद्धतीने दिली.
शेवटच्या सत्राची मांडणी समुपदेशक डॉ. शुभा बलदोटा यांनी केली.
प्रेमभावना ही नैसर्गिक असते. तिला कोणी थांबवू शकत नाही. मात्र तिच्या मर्यादा दोघांनीही कसून पळायला हव्यात. अन्यथा भावनिक, बौद्धिक, मानसिकदृष्ट्या प्रचंड त्रास होतो.
म्हणून स्वतःला ओळखा. प्रत्येकाने स्वजाणीव करून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते .त्यासाठी मित्र, आई-वडील, नातेवाईक, शिक्षक यांची मदत घ्यावी. जोडीदाराची विवेकी निवड करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे असते.
दोघांचा परस्पर विकास करायचा असेल तर परस्परांना व स्वतःला ओळखा. परस्परांना सन्मान द्या. लग्नाबद्दलच्या कल्पनाही अतिशय स्पष्ट असाव्या लागतात. दिखावा नको. सोशल मीडियाच्या आहारी जाऊन कुठलेही निर्णय घेऊ नका. जगण्यासाठी पैसा आवश्यक आहेच. तथापि वैवाहिक जीवनासाठी तो बायप्रॉडक्ट आहे, लग्न ठरवताना ती अट नसावी लग्न ठरवितांना ती अट नसावी. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा उपभोग निःसंकोचपणे घेता येईल हे काळजीपूर्वक पहिले पाहिजे. असे त्यांनी ठासून सांगितले.
प्रथम स्वतःवर प्रेम करा, स्वतःला घडवा तरचं अन्यायापासून तुम्ही दूर राहू शकतात. कुणाच्याही दबावाखाली कधीही लग्नाचा निर्णय घेऊ नका ,असे आवाहन त्यांनी संवादातून मुलीशी बोलताना केले.
अध्यापिका विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती जयश्री साळुंखे यांनी सांगितले की,आज पन्नास विवाहांपैकी जवळपास छत्तीस विवाहांची प्रकरणे न्यायालयात दाखल होतात. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे.
म्हणून विवाह करण्यापूर्वी जोडीदाराची विवेकी निवड करणे अतिशय आवश्यक आहे. यावर त्यांनी भर दिला.
संवाद शाळेत डीएडच्या दोन्ही वर्षांच्या पंच्याहत्तर विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
संवाद शाळेचे प्रास्ताविक अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे यांनी केले.
यावेळी अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव अरुण घोडेराव, रत्नकांत पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
