
‘२३ मार्च रोजी दरवर्षी शहीद दिवस साजरा केला जातो. भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देण्याऱ्या भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्यास्मरर्णार्थ देशभरात शहीद दिवस साजरा केला जातो. २३ मार्च रोजी इंग्रजांनी भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव या भारतमातेच्या वीर जवानांना फाशी दिली होती. त्यांच्या या बलीदानामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली. त्यामुळेच आजचा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. १९२८ मध्ये भारतांमधील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडहून ‘सायमन कमिशन’ नावाचं शिष्टमंडळ आले होतं. भारतात सर्वत्र या शिष्टमंडळाचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. त्यावेळी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता. ‘सायमन परत जा’च्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी आक्रमणात लाला लजपतराय जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. देशभक्तीने भारावलेल्या क्रांतिकारकांना हे सहन झाले नाही. क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या लाहोर पोलिस ठाण्यातील इंग्रज अधिकारी सँडर्स याला ठार मारण्याचे ठरवले. त्याप्रमाणे लालाजींच्या पहिल्या मासिक श्राद्धाच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही वेष पालटून पोलिस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाकडे गेले. सॅण्डर्स दिसताच सुखदेव यांनी संकेत दिला. भगतसिंग आणि राजगुरू यांनी एकाच वेळी गोळ्या झाडून त्याचा बळी घेतला. भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना इंग्रजांविरुद्ध बंड करुन ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन. पी. सॅण्डर्सची हत्या केल्याप्रकरणी २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती. या तिन्ही तरुण देशभक्तांच्या फाशीनंतर तमाम भारतीयांचं रक्त आणखी पेटून उटलं त्यांच्या बलिदानानंतर स्वांतत्र्यांची चळवळ अधिक प्रखर झाली. शहीद भगतसिंग, राजगरु आणि सुखदेव यांच्या स्मर्णार्थ प्रत्येकवर्षी २३ मार्च रोजी श्रद्धांजली वाहत हा दिवस शहीद दिवस म्हणून भारतीय साजरा करतात. शहीद भगतसिंग यांनी आपल्या छोट्याशा आयुष्यात वैचारिक क्रांतिची ज्योत पेटवली. भगतसिंग यांच्या विचारणांनी आजही तरुण प्रभावीत आहेत. भगतसिंगांची लढाई केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरतीच मर्यादित नव्हती तर ती सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी होती. ब्रिटीशांच्या जोखडातून मातृभूमीला मुक्त करण्याबरोबरच समाजवादी रचनेवर आधारित समाज निर्माण करण्याचे भगतसिंग यांचे स्वप्न होते. सर्व माणसांच्या काही अत्यावश्यक गरजा आहेत. सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या अत्यावश्यक गरजा भागविण्याची सोय होणे म्हणजे समाजवाद, अशी भगतसिंगांनी व्याख्या केली होती. त्यांनी म्हटले होते की, ‘क्रांती म्हणजे सध्या अस्तित्वात असणारी साम्राज्यवादी, भांडवली समाजव्यवस्था संपूर्ण उलथवून टाकून तिच्या जागी समाजवादी व्यवस्था प्रस्थापित करणे.’ 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी तिघांना फाशी देण्यात आली. फाशीच्या वेळी तिघांनी ‘मेरा रंग दे बसंती चोला, माय रंग दे; मेरा रंग दे बसंती चोला।’ हे गाणे गायले होते.स्व. भगतसिंह स्व. सुखदेव व स्व. राजगुरू यांना शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
