
नाशिक:( प्रतिनिधी )- विश्वास ग्रुप, महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे, शाखा जलालपूर (नाशिक) आणि अ.भा.मराठी प्रकाशक संघाच्या नाशिक शाखेच्या वतीने रविवार दि.५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सावानाच्या ग्रंथालयभूषण मु.शं.औरंगाबादकर सभागृहात आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या ‘राजीव बर्वे यांची कविता-स्वरूप आणि आकलन’ आणि साहित्यिक राजीव बर्वे यांचे दिलीपराज प्रकाशनाचे प्रकाशित केलेले ‘मनातील पत्रे’ हे ३०००वे पुस्तक सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार प्रकाश होळकर यांच्या हस्ते आणि विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. लेखक डॉ.श्रीपाल सबनीस आणि पुणे येथील दिलीपराज प्रकाशनचे संचालक राजीव बर्वे उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यात साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ समीक्षक डॉ.एकनाथ पगार, प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे आणि प्रसिद्ध विनोदी साहित्यिक नरेश महाजन यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. प्रकाशनापूर्वी सायंकाळी ५.३० वाजता ज्येष्ठ साहित्यिक तुकाराम ढिकले, जयश्री वाघ, रतन पिंगट, मुकुंद ताकाटे, राजेंद्र सोमवंशी या निमंत्रित कवींचे कवी संमेलन होईल. सूत्रसंचालन राजेंद्र उगले करणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाचे प्रणेते विनायक रानडे, रेडिओ विश्वासच्या समन्वयक ऋचिता ठाकूर, प्रकाशक संघाच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष विलास पोतदार, उपाध्यक्ष वसंतराव खैरनार आदींनी केले आहे.
