
नांदगाव (वार्ताहर ):नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पिंप्राळे शिवारात रस्ता बांधकाम विभागाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंप्राळे ते जामधरी जुन्या रस्त्यावर शेतकऱ्यांच्या जमिनीमधून अनधिकृतपणे नाला बांधण्याचे काम सुरू असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.या संदर्भात मच्छिंद्र सदगीर, प्रकाश सदगीर, पंढरीनाथ सदगीर, परसराम सदगीर आदी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून तीव्र हरकत नोंदवली आहे.शेतकऱ्यांचे म्हणणे असे की, गट नं. 36/1, 36/3, 35/2/क व 41/2 या शेतजमिनींच्या लगत मोऱ्या टाकून नाला काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु अशा प्रकारे मोऱ्या टाकल्यास पावसाळ्यातील पाणी थेट शेतात जाऊन पीकहानी व जमिनीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी प्रशासनाला सुचवले आहे की, रस्त्याचे पाणी थेट शेतात न वळवता रस्त्याच्या कडेने नाले करून ते पुढील नैसर्गिक नाल्यात सोडावे. मात्र शेतजमिनींतून जबरदस्तीने नाला नेण्याचा प्रयत्न झाला, तर “आम्हाला शेतजमिनी वाचवण्यासाठी प्राणांतिक उपोषणासारखे आंदोलन करावे लागेल,” असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.सदर प्रकरणामुळे पिंप्राळे गावासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निर्णयाकडे लागले असून, आता संबंधित प्रशासन शेतकऱ्यांच्या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहते का? याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

