
नाशिक( प्रतिनिधी). :- अंगाईगीत, जात्यावरच्या ओव्या, लग्नाची गाणी, विडंबने, गझल, माता-पित्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देणाऱ्या कवितांसह एकापेक्षा एक सरस कविता सादर करत कवी रवींद्र मालुंजकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना कवितेच्या गावाची सफर घडवत श्रवणानंद दिला. माणेकशा नगरमध्ये द्वारका परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे मान्यवर सत्कार आणि सभासदांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने ‘चला कवितांच्या गावात’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. श्री.मालुंजकर पुढे म्हणाले की, साहित्य विशेषतः कविता आपल्याला बालपणापासून सोबत करत असतात. उत्तम साहित्य हे माणसाचं जीवन घडवत असतं. नाशिक ही साहित्यपंढरी आहे आणि या साहित्य पंढरीचा छोटासा वारकरी म्हणून मला निश्चितच अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले. त्यांनी सादर केलेल्या लेक आणि मातापित्यांच्या जीवनावरील कवितांनी ज्येष्ठ नागरिक भावनाशील झाले.

आयस्कॉनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अशोकराव होळकर, हुतात्मा स्मारकचे विजय राऊत, पी.जी.क्षीरसागर यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असणाऱ्या सभासदांच्या अभीष्टचिंतनासह या महिन्यात नव्याने संस्थेचे सभासद झालेल्या ज्येष्ठांचे आणि देणगीदारांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास शंभरहून अधिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्याध्यक्ष धनंजय चतुर यांनी केले तर व्याख्यात्यांचा परिचय उपाध्यक्ष पी.डी.काळे यांनी करून दिला. आभार अध्यक्ष रवींद्र कुलकर्णी यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शशिकांत उपासनी, साहेबराव जाधव, सुभाष शिंदे, अशोक जोशी, जयराम वाघ, सुभाष आंबेकर, श्रीमती आंधोळकर, कौसल्या पाटील, बापूसाहेब देवरे, कैलाश धूत, सुनीता जोशी यांच्यासह संस्थेच्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.
